मुंबई : सोशल मीडियावर महिलांना हेरुन त्यांना अश्लील मेसेज पाठवण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्याचं चित्र आहे. मात्र अशाच एका प्रकरणात सध्या एका टीव्ही अँकरला त्रासाला सामोरे जावे लागलं आहे. मुंबईतल्या कफ परेड पोलीस ठाण्यात संबंधित अँकरकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर पोलिसांनी अश्लील मेसेज करणाऱ्या या विकृताला पश्चिम बंगालमधून अटक केली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणातील पीडित टीव्ही अँकर तरुणीला आरोपी अश्लील मेसेज करत होता. फेसबुकवर वेगवेगळ्या नावाने त्याने अकाऊंटही बनवली होती, पण पीडित तरुणीने त्याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र आरोपीने आणखी त्रास द्यायला सुरुवात केली. फेसबुकवर आरोपीच्या अकाऊंटला पीडितेने ब्लॉक केले होते. मात्र तरीसुद्धा दुसऱ्या नावाने अकाऊंट उघडून त्याने अश्लील मेसेज करायला सुरुवात केली होती.
आतानु रवींद्र कुमार असे या आरोपीचे नाव असून त्याने पीडित तरुणीला टीव्हीवर पाहिले होते आणि फेसबुकवर तिचे नाव सर्च करुन तिला मेसेज करायला सुरुवात केली होती. मात्र तरुणीने त्याला फेसबुकवर ब्लॉक केल्यानंतर वेगवेगळ्या तीन अकाऊंटच्या माध्यमातून त्याने तरुणीला मेसेज केले होते. या तरुणीचे लग्न झाले असून तिच्या पतीने या आरोपीला जाब विचारला होता पण त्याने त्यालासुद्धा आणि तरुणीच्या सासूला अश्याप्रकारचे मेसेज करायला सुरुवात केली होती.
शेवटी कंटाळून तरुणीने कफ परेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आणि पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे त्याला पश्चिम बंगालमधून अटक केली आहे. सध्या त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.