PNB घोटाळा : सहा आरोपींना 5 मार्चपर्यंत CBI पोलिस कोठडी
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई | 21 Feb 2018 09:14 PM (IST)
विशेष सीबीआय न्यायालयाने सहा आरोपींना 5 मार्चपर्यंत सीबीआय पोलीस रिमांडमध्ये पाठवले आहे.
मुंबई : गीतांजली कंपनी आणि नक्षत्र कंपनीचा सीएफओ कपिल खंडेलवाल आणि गीतांजली कंपनीचा व्यवस्थापक नितेन शाही यांना आज सीबीआयने कोर्टात हजर केलं असता विशेष सीबीआय न्यायालयाने या दोन्ही आरोपींना 5 मार्चपर्यंत सीबीआय पोलीस रिमांडमध्ये पाठवले आहे. पीएनबी बँकेच्या घोटाळ्यासंदर्भात सीबीआयनं मंगळवारी केलेल्या कारवाईत मेहुल चोक्सी याच्या गीतांजली आणि नक्षत्र कंपनीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना अटक केली होती. या बरोबरच नीरव मोदी याच्याविरोधात कारवाई करत पीएनबी बँकेसंदर्भात सीबीआयकडून अटक करण्यात आलेल्या फायरस्टार कंपनीचा वित्तीय अध्यक्ष विपुल अंबानी, एक्झिक्युटिव्ह असिस्टंट कविता मानकीकर आणि सीनियर एक्झिक्युटिव्ह अर्जुन पाटीलसह पीएनबी बँकेच्या ब्रॅडी हाऊस शाखेचा तत्कालीन प्रमुख अधिकारी राजेश जिंदाल या चार आरोपींनाही विशेष सीबीआय न्यायालयाने पाच मार्चपर्यंत सीबीआय पोलिस कोठडी सुनावली आहे. न्यायालयात या आरोपींना हजर केलं असता सीबीआयकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या चौकशीची माहिती सीबीआय न्यायालयाला देण्यात आली. हा घोटाळा 2010 पासून सुरु असल्याचं सीबीआयच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं. 2010 पासूनच नीरव मोदीला लेटर ऑफ अंडरटेकिंग दिलं जात होतं, याची माहिती ब्रॅडी ब्रँच हेड राजेश जिंदालला होती. अटक करण्यात आलेल्या कविता मानकीकर यांना पुरुष अधिकाऱ्याने अटक केली असून ही अटक सूर्यास्तानंतर झाल्याचा युक्तिवाद कविता यांचे वकील विजय अग्रवाल यांनी केला आहे. दरम्यान विपुल अंबानीचे वकील अमित देसाई हे सीबीआय न्यायालयात हजर होते. विपुल अंबानी हे फायरस्टार कंपनीचे जवाबदार अधिकारी आहेत, पण घडलेल्या प्रकरणाशी त्यांचा काहीही संबंध नसून सीबीआयने त्यांच्यावर लावलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. यापूर्वी पीएनबीच्या मुंबईतील ब्रिच कँडी ब्रँचचा तत्कालीन शाखा उपव्यवस्थापक (डेप्युटी ब्रँच मॅनेजर) गोकुळनाथ शेट्टी, सिंगल विंडो ऑपरेटर मनोज खराज आणि निरव मोदी ग्रुप ऑफ फर्म्सचा अधिकृत स्वाक्षरीकर्ता (ऑथराईज्ड सिग्नेटरी) हेमंत भट याला अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत 11 जणांना बेड्या ठोकण्यात यश आलं आहे.