मुंबई : 'मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉन्व्हर्जन्स 2018' च्या माध्यमातून राज्यात 12 लाख 10 हजार 464 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे 4 हजार 106 सामंजस्य करार झाले आहेत. त्या माध्यमातून 36 लाख 77 हजार 185 जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. राज्याच्या अविकसित भागात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.


वांद्रे कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर सुरु असलेल्या मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉन्व्हर्जन 2018 जागतिक गुंतवणूक परिषदेचा समारोप काल (मंगळवारी) झाला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील, मुख्य सचिव सुमित मल्लिक, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल आदी यावेळी उपस्थित होते.


यावेळी रिलायन्स उद्योग समूहाबरोबर 60 हजार कोटी रुपये गुंतवणुकीच्या तसेच राज्य शासन व भारतीय रेल्वे यांच्या समवेत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. 'सहभाग' या वेबपोर्टलचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.


मॅग्नेटिक महाराष्ट्रला प्रचंड यश मिळालं आहे. राज्याच्या अविकसित भागात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक झाली आहे. त्याचा फायदा मराठवाड्याला मोठ्या प्रमाणावर होणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. एकूण 4 हजार 106 सामंजस्य करार झाले असून त्या माध्यमातून राज्यात 12 लाख 10 हजार 464 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे.


सर्वात जास्त गुंतवणूक उद्योग क्षेत्रात (5 लाख 48 हजार 166 कोटी) इतकी होणार असून गृह निर्माण क्षेत्रात 3 लाख 85 हजार कोटी तर ऊर्जा क्षेत्रात 1 लाख 60 हजार 268 कोटी गुंतवणूक होणार आहे. शासनाच्या विविध पायाभूत प्रकल्पांचे 104 सामंजस्य करार झाले असून त्या माध्यमातून 3 लाख 90 हजार 400 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. या माध्यमातून 2 लाख 6 हजार 266 रोजगार निर्मिती होणार आहे. राज्य शासनाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून संरक्षण आणि हवाई उद्योगासाठी 1 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.


रेल्वेसोबत झालेल्या 600 कोटी रुपयांच्या सामंजस्य करारामुळे लातूरमध्ये सुमारे 350 एकर जागेवर रेल्वे कोच निर्मिती कारखाना पहिल्या टप्प्यात सुरु करण्यात येणार आहे. यामुळे या भागात 15 हजार जणांना थेट रोजगार मिळणार आहे. तर त्याच्या तिप्पट अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल.


हा प्रकल्प एकूण 2 हजार हेक्टर जागेवर तयार करण्यात येत आहे. तिथे मेट्रो कोच निर्मिती होणार आहे. मेट्रोचे हे डब्बे देशाबरोबरच जागतिक स्तरावर देखील पाठवण्यात येतील. या प्रकल्पामुळे लातूर, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यांचे भाग्य उजळणार आहे. मराठवाडा भागात गेल्या अनेक वर्षात कुठलाही मोठा प्रकल्प आला नव्हता. रेल्वेसोबत झालेल्या सामंजस्य करारामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे.


राज्याच्या गडचिरोली, हिंगोली, नांदेड, परभणी, नंदूरबार यासारख्या औद्योगिकदृष्ट्या अविकसित भागात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार आहे. नव्याने सुरु करण्यात आलेल्या 'सहभाग' वेबपोर्टलच्या माध्यमातून सामाजिक उत्तरदायित्व निधीचा (सीएसआर) वापर सामाजिक विकासासाठी करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


महाराष्ट्राने देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे, असं केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल म्हणाले. केंद्र शासनाने 2004 ते 2014 या पाच वर्षात 5 हजार 857 कोटी रुपये रेल्वे विकासासाठी महाराष्ट्रात गुंतवले होते. मात्र त्यानंतर आतापर्यंत 24 हजार 400 कोटी रुपये महाराष्ट्रासाठी देण्यात आले आहेत. लातूरमध्ये सुरु होणारा रेल्वे कोच निर्मिती कारखाना अवघ्या एका बैठकीत मंजूर करण्यात आला. त्याचबरोबर या प्रकल्पासाठी लागणारी जमिन देखील तातडीने हस्तांतरित करण्यात आली. या गतिमान निर्णयाबद्दल गोयल यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केलं. या ठिकाणी निर्माण होणारे मेट्रोचे कोच हे देशातच नव्हे तर जागतिक स्तरावर पाठवण्यात येतील. मेट्रोच्या कोचला 50 टक्के मागणी ही अवघ्या महाराष्ट्रातूनच होते, असंही गोयल यांनी सांगितलं.


मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉन्व्हर्जन्सचा समारोप झाला असला तरी यामध्ये असलेले प्रदर्शन पुढील तीन दिवस सुरु राहणार आहे, असं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं. दोन वर्षांपूर्वी झालेल्या मेक इन इंडिया सप्ताहात आठ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले होते. त्यापैकी दोन वर्षात 61 टक्के सामंजस्य करार प्रत्यक्षात कार्यरत झाले. यामुळे युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळणार आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉन्व्हर्जन्सच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने 13 विविध धोरणे जाहीर केली आहेत. महाराष्ट्र हे उद्योगस्नेही राज्य असल्याचे सांगत देसाईंनी गुंतवणुकदारांचे आभार मानले.


मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉन्व्हर्जन्स 2018 मधील गुंतवणूक :


गृह निर्माण - 7 प्रस्ताव 3 लाख 85 हजार गुंतवणूक

कृषी - 8 प्रस्ताव 10 हजार 278 कोटी गुंतवणूक

पर्यटन व सांस्कृतिक - 17 प्रस्ताव 3 हजार 716 कोटींची गुंतवणूक

ऊर्जा - 17 प्रस्ताव 1 लाख 60 हजार 268 कोटींची गुंतवणूक

इतर - 408 प्रस्ताव 95 हजार कोटींची गुंतवणूक

कौशल्य विकास - 113 प्रस्तावातून 1 लाख 767 रोजगार निर्मिती

उच्च शिक्षण - 12 प्रस्ताव, 2 हजार 436 कोटी गुंतवणूक

महाआयटी - 8 प्रस्ताव 5 हजार 700 कोटी गुंतवणूक

उद्योग क्षेत्र - 3516 प्रस्ताव, 5 लाख 48 हजार 166 कोटींची गुंतवणूक

असे एकूण 4106 प्रस्तावातून 12 लाख 10 हजार 464 कोटींची गुंतवणूक


प्रमुख औद्योगिक प्रकल्प


रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड - 60 हजार कोटी

व्हर्जिन हायपरलूप वन - 40 हजार कोटी

थ्रस्ट एअरक्राफ्ट क्लस्टर (अमोल यादव) - 35 हजार कोटी

जेएसडब्ल्यू इलेक्ट्रिक व्हेइकल - 6 हजार कोटी

ह्योसंग कंपनी - 1250 कोटी

महिंद्रा इलेक्ट्रिक व्हेईकल - 500 कोटी


अविकसित भागातील महत्त्वाचे प्रकल्प


लॉइड मेटल अँड एनर्जी, गडचिरोली - 700 कोटी

जिनस पेपर अँड बोर्ड, नंदूरबार - 700 कोटी

टेक्नोकार्ट इंडस्ट्री, अमरावती - 183 कोटी

इंडिया ॲग्रो अनाज लिमिटेड, नांदेड - 200 कोटी

शिऊर ॲग्रो लिमिटेड, हिंगोली - 125 कोटी


मध्यम, लघू व सूक्ष्म उद्योग क्षेत्रातील महत्त्वाचे प्रकल्प


कॉयर क्लस्टर, सिंधुदुर्ग - 7.56 कोटी

मेगा लेदर क्लस्टर, रायगड - 500 कोटी

चित्रावारली फाऊंडेशन आर्ट अँड क्राफ्ट क्लस्टर - पालघर - 1 कोटी

इलेक्ट्रॉनिक क्लस्टर, नागपूर - 5 कोटी

गोल्ड ज्वेलरी क्लस्टर, अहमदनगर


महत्त्वाचे गृहनिर्माण प्रकल्प


क्रेडाई महाराष्ट्र - 1 लाख कोटी (पाच लाख परवडणारी घरे)

नारेडको - 90 हजार कोटी (3 लाख परवडणारी घरे)

खलिजी कमर्शियल बँक अँड भूमी राज - 50 हजार कोटी (2 लाख परवडणारी घरे)

पोद्दार हाऊसिंग - 20 हजार कोटी (1 लाख परवडणारी घरे)

कन्सेप्टच्युअल ॲडव्हायजरी सर्व्हिस - 25 हजार कोटी (1 लाख परवडणारी घरे)


वस्त्रोद्योग क्षेत्रातील महत्त्वाचे प्रकल्प


ह्योसंग - 1250 कोटी

निर्वाण सिल्क - 296 कोटी

पलक इंडस्ट्रिज, अमरावती - 25 कोटी

सुपर ब्ल्यू डेनिम - 125 कोटी

व्हेरिटो टेक्स्टाईल अमरावती - 25 कोटी


ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाचे प्रकल्प


अदानी ग्रीन एनर्जी - 7 हजार कोटी

रि न्यू पॉवर व्हेंचर - 14 हजार कोटी

टाटा पॉवर - 15 हजार कोटी

सॉफ्ट बँक एनर्जी - 23 हजार कोटी

युनिव्हर्जी थिंक ग्रीन - 24 हजार कोटी


कृषी व विपणन क्षेत्रातील प्रकल्प


जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने हवामान आधारित कृषी प्रकल्प - 4 हजार कोटी

आयसीआरआयएसएटी, हैद्राबाद, किसानमित्र - विदर्भातील अकरा जिल्ह्यात 66 कोटी गुंतवणूक

रॉयल ॲग्रो फूडस् - 1400 कोटी

पलासा ॲग्रो - 2700 कोटी


फ्युचरिस्टिक सेगमेंट


व्हर्जिन हायपरलूप वन - 40 हजार कोटी

रिलायन्स इंडस्ट्रिज - 60 हजार कोटी

आयएसडब्ल्यू इलेक्ट्रिक व्हेइकल - 6 हजार कोटी

महिंद्रा इलेक्ट्रिक व्हेइकल - 500 कोटी


लॉजिस्टिक मधील महत्त्वाचे प्रकल्प


देवीसिटी लॉजिस्टिक पार्क नागपूर - 424 कोटी

राज बिल्ड इन्फ्रा - 3 हजार कोटी

लॉजिस्टिक पार्क, पुणे - 100 कोटी


थेट परकीय गुंतवणुकीचे महत्त्वाचे प्रकल्प


कॅरियर मिडिया इंडिया प्रा. लि. - 300 कोटी

एमर्सन प्रोसेस मॅनेजमेंट - 815 कोटी

आयएलजीआयएन ग्लोबल इंडिया - 750 कोटी

एलजी इलेक्ट्रॉनिक्स - 350 कोटी

ओव्हनस कॉर्निंग इंडिया - 1050 कोटी

पेरी विर्क - 728 कोटी


पायाभूत सुविधांमधील प्रकल्पामध्ये शासनाची गुंतवणूक


वाहतूक आणि बंदरे - 48 प्रकल्प, 59 हजार 32 कोटींची गुंतवणूक

सार्वजनिक बांधकाम - 5 प्रकल्प, 1 लाख 21 हजार 50 कोटींची गुंतवणूक

मुंबई महानगरपालिका - 18 प्रकल्प, 54 हजार 433 कोटींची गुंतवणूक

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण - 30 प्रकल्प, 1 लाख 32 हजार 761 कोटी

नगर विकास - 3 प्रकल्प, 23 हजार 143 कोटी