मुंबई : पीएनबी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं काल (रविवार) आणखी चार जणांना अटक केली आहे. यात नीरव मोदी ग्रुपचे 2 लेखापाल आणि गीतांजली समुहाचे संचालकासह आणि एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे.

पीएनबीकडून कर्ज घेताना खोटा एलओयू दाखवल्याचा आरोप मनीष बोसामिया आणि मीतेन पांड्या यांच्यावर करण्यात आला आहे. तर दुसरीकडे मुंबईतील संजय रामभियालादेखील याच प्रकरणातील तपासासाठी अटक करण्यात आली आहे.

पीएनबीला पाठवण्यात येणारे एलओयू आणि एफएलसी याच्यावर स्वाक्षऱ्या केल्याच्या आरोपाखाली चौथा आरोपी शिवरमण नायरला अटक करण्यात आली आहे. सध्या सीबीआयकडून या चौघांची कसून चौकशी सुरु आहे.

घोटाळा कसा झाला?

नीरव मोदी आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांनी आपल्या तीन कंपन्यांद्वारे हे षडयंत्र रचल्याचा आरोप आहे. तीन कंपन्यांच्या नावावर हाँगकाँगमधून सामान येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सामान मागवण्यासाठी लेटर ऑफ अंडरटेकिंगची मागणी बँकेकडे केली.

लेटर ऑफ अंडरटेकिंग म्हणजे मागवण्यात आलेल्या सामानाचे पैसे देण्याची जबाबदारी बँक घेत असल्याचं पत्र. हेच पत्र अलाहाबाद बँक आणि अॅक्सिस बँकेच्या हाँगकाँगमधल्या शाखांच्या नावावर काढण्याची मागणी केली. याद्वारे हाँगकाँगहून 280 कोटी रुपयांचं सामान मागवण्यात आलं.

पीएनबीने हाँगकाँगमधील अलाहाबाद बँकेला 5 आणि अॅक्सिस बँकेला 3 लेटर ऑफ अंडरटेकिंग जारी केली आणि जवळपास 280 कोटी रुपयांचं सामान आणण्यात आलं. 18 जानेवारीला या तिन्ही कंपन्यांचे संबंधित अधिकारी पीएनबीच्या मुंबई शाखेत गेले आणि त्यांनी सामानाचे पैसे भरण्यास सांगितलं.

कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बँकेचं लेटर दाखवलं आणि पेमेंटची मागणी केली. जितके पैसे परदेशात पाठवायचे आहेत, तितकी कॅश भरायला  बँक अधिकाऱ्यांनी सांगितलं. मात्र बँकेने जेव्हा चौकशी केली तेव्हा त्यांची झोपच उडाली. कारण बँकेत एक रुपयाही न ठेवता या कंपन्यांनी लेटर ऑफ अंडरटेकिंग जारी करायला लावल्याचं उघड झालं.

बँकेने तक्रार दाखल केली असून हे प्रकरण आता सीबीआयपर्यंत पोहोचलं आहे. नीरव मोदी यांना जारी केलेले आठही लेटर ऑफ अंडरटेकिंग बनावट असल्याचं उघड झालं. पीएनबीचे डेप्युटी मॅनेजर गोकुळनाथ शेट्टी यांनी एका कर्मचाऱ्याला हाताशी घेऊन हे लेटर जारी केल्याची माहिती आहे. त्यामुळे आता 280 कोटी रुपये पीएनबीला चुकते करावे लागणार आहेत.

संबंधित बातम्या :

CBI आणि ED नीरव मोदी-मेहुल चोक्सीकडून पैसा कसा वसूल करणार?


नीरव मोदी फरार नाही, कामासाठी अगोदरपासूनच परदेशात : वकील


नीरव मोदी प्रकरणामुळे जेटलींवर मोदी नाराज : पृथ्वीराज चव्हाण


पीएनबीने प्रकरण सार्वजनिक केल्याने देणं देऊ शकत नाही : नीरव मोदी


PNB घोटाळा : नीरव मोदी, मेहुल चोक्सीचे पासपोर्ट रद्द


PNB ला 11 हजार कोटींना गंडवणारे नीरव मोदी देशाबाहेर पळाले



पीएनबी घोटाळा : डायमंड किंग नीरव मोदीवर गुन्हा दाखल


पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील शाखेत 11 हजार कोटींचा गैरव्यवहार