मुंबई : पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेले बँकेचे माजी अध्यक्ष वरयाम सिंह आणि एचडीआयएलचे संचालक राकेश वाधवान आणि व्यवस्थापकीय संचालक सारंग वाधवान या पितापुत्रांना बुधवारी किल्ला कोर्टानं 23 ऑक्टोंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आहे. दरम्यान ईडीनं या प्रकरणी अटकेत असलेल्या दोन आरोपींचा ताबा मिळावा यासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला आहे.
एचडीआयएलचे राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांचा ताबा मिळावा, अशी मागणी या अर्जामध्ये करण्यात आली आहे. पीएमएलए कायद्याअंतर्गत या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दोन्ही आरोपींचा ताबा मिळावा, असं या अर्जामध्ये म्हटले आहे. ईडीने आतापर्यंत सुमारे 3800 कोटी रुपयांची मालमत्ता या प्रकरणामध्ये जप्त केली आहे. हा ताबा मिळण्याबाबत इतर कागदोपत्री कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश न्यायालयाने ईडीला दिले आहेत.
पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेच्या चार हजार 335 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा (ईओडब्ल्यू)नं बँकेचे माजी अध्यक्ष वरयाम सिंह आणि एचडीआयलचे संचालक राकेश वाधवान आणि व्यवस्थापकीय संचालक सारंग वाधवान या पिता पुत्रांना अटक केली आहे. त्यांना मुंबईतील किल्ला कोर्टासमोर हजर करण्यात आल्यानंतर अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी एस. जी. शेख यांनी त्यांना 23 ऑक्टोक्टोंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. या तीन आरोपींव्यतिरिक्त याप्रकरणी ईओडब्ल्यूने बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक जोय थॉमस यांनाही अटक केलेली आहे. त्यांना दिलेल्या पोलीस कोठडीची मुदत 17 ऑक्टोबरला संपणार आहे.
बुधवारीही सुनावणीदरम्यान, पीएमसी बँकेचे शेकडो ठेवीदार, फलक घेऊन दक्षिण मुंबईतील किल्ला कोर्टाच्या आवारबाहेर जमले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने केली. 11,000 कोटींपेक्षा जास्त ठेवी असलेल्या या बँकेत घोटाळा उघडकीस आल्यानंतर रिर्झव्ह बँकेने गेल्या महिन्यात त्यावर प्रशासक नेमून पैस काढण्यास खातेधारकांना मर्यादा घालून दिली आहे.