ठाणे : ठाण्यात खड्ड्याचा आणखी एक बळी गेला आहे. भरधाव डंपरच्या धडकेत 22 वर्षीय दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मंगळवारी रात्री शिळ-डायघर परिसरात हा अपघात घडला. असिम सिद्दीकी असं मृत तरुणाचं नाव असून तो मुंब्रा येथील तन्वरनगर परिसरात राहत होता.


असिम मंगळवारी रात्री आपल्या मित्रासोबत दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी शिळ परिसरात गेला होता. शिळ-डायघर येथील रस्ता खड्डेमय झाला असून या परिसरात नेहमीच अवजड वाहनांची रिघ लागलेली असते. मंगळवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास भरधाव डंपरची धडक दुचाकीला बसल्याने असिम व त्याचा मित्र खाली पडून जखमी झाले.


असिमच्या डोक्याला मार लागून गंभीर दुखापत झाल्याने त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र बुधवारी सकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. असिमचे वडील जावेद सिद्दीकी यांनी रस्त्यावरील खड्यांमुळे मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे.


अपघातानंतर डंपर चालक पसार झाला असून याप्रकरणी शिळडायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.