मुंबई : पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक अर्थात पीएमसी बँक प्रकरणात आज तीन माजी संचालकांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. मुक्ती बाविसी, तृप्ती बने आणि जगदीश मोखे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अटक केलेल्या तिन्ही माजी संचालकांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आजच्या तीन अटकेनंतर पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यांची संख्या 12 वर पोहोचली आहे.


भाजपचे माजी आमदार सरदार तारा सिंह यांचा मुलगा रजनीत सिंहला 16 नोव्हेंबरला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. रजनीत सिंह पीएमसी बँकेचा रिकव्हरी बोर्डचा संचालक होता. रजनीत सिंह गेल्या 19 वर्षांपासून रिकव्हरी समितीवर होता आणि 2008 पासून एचडीआयएलकडून त्यांना देण्यात आलेल्या लोनची रिकव्हरी करण्यात आलेली नाही. ज्याचा फटका सामन्य खातेदारांना बसला आहे.


पीएमसी बँकेत घोटाळा झाला तेव्हा जयेश संघानी आणि केतन लकडावाला स्टॅट्युटरी ऑडिटर होते. या घोटाळ्यात बँकेचे बडे अधिकारी गुंतले आहेत. बँकेत झालेल्या अनियमितता झाकण्यामध्ये जयेश आणि केतन या दोघांनी महत्वाची भूमिका बजावल्याचा संशय आहे. पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत 12 जणांना अटक केली आहे. यामध्ये एचडीआयएल कंपनीचे प्रवर्तक आणि बँकेच्या बड्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.


पीएमसी बँकेचा 4,355 कोटी रुपयांचा घोटाळा समोर आल्यानंतर रिझर्व्ह बँकेने काही निर्बंध आणले, ज्याचा फटका खातेदारांना बसला. रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेतून पैसे काढण्यावर निर्बंध आणले, या तणावामुळे काही खातेदारांचा मृत्यू सुद्धा झाला.


एकूण 12 जणांना अटक




  1. राकेश वाधवान (कार्यकारी अध्यक्ष, HDIL GROUP)

  2. सारंग वाधवान ( राकेश वाधवानचा मुलगा आणि HDIL चा उपाध्यक्ष आणि MD)

  3. जॉय थॉमस ( माजी एमडी, PMC बँक)

  4. वर्यम सिंह (HDIL चे माजी संचालक आणि PMC बँकेचे माजी अध्यक्ष)

  5. सुरजित सिंह अरोरा ( संचालक PMC बँक)

  6. जयेश संघांनी (ऑडिटर)

  7. केतन लकडावाला (ऑडिटर)

  8. अनिता किर्दत (ऑडिटर)

  9. रजनीत सिंह (संचालक PMC बँक)

  10. मुक्ती बाविसी (माजी संचालक)

  11. तृप्ती बने (माजी संचालक)

  12. जगदीश मोखे (माजी संचालक)