मुंबई : राज्यात सुरु असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकास कामांना थांबवणार नाही. तसेच उपलब्ध निधी पाहता त्यांचा प्राधान्यक्रम ठरवून ही कामे वेळेत पूर्ण करावीत, सामान्य जनतेला त्याचा वेळीच लाभ घेता येईल, या दृष्टीने पावलं उचलली जाणार आहेत. केवळ आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिली आहे. असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितलं.


मंत्रालयात मुख्यमंत्र्यांनी मेट्रो, मुंबई, ट्रान्स हार्बर लिंक, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, समृद्धी महामार्ग या प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, छगन भुजबळ, जयंत पाटील यांच्यासह मुख्य सचिव अजोय मेहता, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, मेट्रोच्या अश्विनी भिडे, समृद्धी महामार्गाचे राधेश्याम मोपलवार यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


पायाभूत सुविधांसाठी असलेल्या विकासकामांच्या आड आम्ही येणार नाही. मात्र उपलब्ध निधी व त्याचा विनियोग आणि स्थानिकांना त्याचा होणारा लाभ, या सर्व बाबींचा विचार करुन या पायाभूत सुविधांच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवणे आवश्यक आहे. सध्या सुरु असलेल्या विविध पायाभूत सुविधांच्या विकासकामांना थांबवणार नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं. कुठलाही विकास प्रकल्प राबवताना स्थानिक लोकांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. प्रशासनामार्फत तळमळीने काम केलं जातं, मात्र कामाची प्रगती आणि निधी याचा ताळमेळ घालणंही आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.


मेट्रोसाठी ठिकठिकाणी आवश्यक असणाऱ्या कारशेडच्या उभारणीबाबत स्थानिकांना विश्वासात घेऊन मार्ग काढण्यात येईल. त्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगतानाच विकास कामांसाठी एक पाऊल उचलताना पुढच्या शंभर पावलांचा धोका ओढावून घेतोय का? याचाही विचार केला पाहिजे. समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात देखील समृद्धी आली पाहिजे. असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. यावेळी मुंबई मेट्रो, नवी मुंबई विमानतळ, समृद्धी महामार्ग, एमटीएचएल या कामांबद्दल सादरीकरण करण्यात आले.