ठाणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ठाण्यातील प्रचारसभेत उपस्थित असलेल्या पंजाब महाराष्ट्र (पीएमसी) बँकेच्या संतप्त खातेदारांनी अचानक निदर्शने केल्याने खळबळ उडाली. हातात फलक घेऊन न्याय देण्याची मागणी करणाऱ्या या खातेदारांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेऊन याचा पाठपुरावा करून पंतप्रधानांनाही यात लक्ष घालण्यास सांगेन, असे आश्वासन खातेधारकांना दिले.


विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शुक्रवारी ठाण्यात आले होते. ठाणे महापालिकेसमोरील रस्त्यावर रात्री पार पडलेल्या जाहीर प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षात केलेल्या विकासकामांचा उहापोह केला. दरम्यान,सभा संपल्यानंतर माघारी निघत असतानाच महापालिका मुख्यालयाच्या आवारात गोळा झालेल्या पीएमसी बँक खातेदारांनी हातातील फलक दर्शवून मुख्यमंत्र्यांसमोर निदर्शने करण्यास सुरुवात केली.

काही दिवसांपूर्वीच पीएमसी बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध टाकल्याने बँक अडचणीत सापडली आहे. या पार्श्वभूमीवर बँकेतील आमची रक्कम परत करा, आमचीही दिवाळी आनंदाने जाऊ द्या, अशा मागण्या खातेदारांनी केल्या.  खातेदारांचा रोष ओळखून मुख्यमंत्री फडणवीस तात्काळ या खातेदारांना येऊन भेटले. त्यांनी, सध्या आचारसंहिता सुरु असल्याने याबाबत काही बोलू शकत नाही. तरीही 21 तारखेला मतदान झाल्यानंतर तातडीने याचा पाठपुरावा करू. येत्या 15 किंवा 16 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी येत असून त्यांच्या समोर ही बाब मांडू. खातेदारांवर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासनही फडणवीस यांनी दिले.