मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. परंतु मोदींच्या दौऱ्याआधी शिवसेना आणि भाजपमधला तणाव आणखीच वाढला आहे. दोन्ही पक्षांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. मेट्रो भूमीपूजनाच्या कार्यक्रमावर शिवसेनेने बहिष्कार घातला आहे.
ठाणे आणि पुण्यात मेट्रोच्या कामांचं भूमीपूजन मोदींच्या हस्ते होणार आहे. कल्याणमधील फडके मैदानात दुपारी दोनच्या सुमारास कल्याण-भिवंडी-ठाणे मेट्रो प्रकल्पाचं मोदींच्या हस्ते भूमीपूजन होईल. परंतु या भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना निमंत्रण नसल्याने शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदार आणि नगरसेवक उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. ठाण्यात भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांकडून मेट्रोच्या श्रेयवादासाठी जोरदार बॅनरबाजी करण्यात येत आहे.
याआधी उद्धव ठाकरेंनी मुंबईतील कोस्टल रोडच्या भूमीपूजन केलं होतं. त्यावर भाजपने बहिष्कार घातला होता. त्यामुळे 2019 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा श्रेयवादाची लढाई रंगलेली दिसत आहे.
उद्धव ठाकरेंच्या हस्ते कोस्टल रोडचे भूमीपूजन, भाजपचा बहिष्कार
दरम्यान, नरेंद्र मोदींचं आज सकाळी दहाच्या सुमारास विशेष विमानाने मुंबईत आगमन होईल. राजभवनावर आर के लक्ष्मण यांच्यावरील एका पुस्तकाचं प्रकाशनही त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर एका खासगी वाहिनीच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत.
दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानंतर आज सायंकाळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह देखील मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवत या दौऱ्याचं आयोजन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संध्याकाळी मुख्यमंत्री आणि प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे. पाच राज्यात झालेल्या पराभवानंतर भाजपचं नेतृत्त्व जोमाने कामाला लागलं आहे.
मोदींच्या हस्ते होणाऱ्या मेट्रो भूमीपूजनावर शिवसेनेचा बहिष्कार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Dec 2018 08:39 AM (IST)
याआधी उद्धव ठाकरेंनी मुंबईतील कोस्टल रोडच्या भूमीपूजन केलं होतं. त्यावर भाजपने बहिष्कार घातला होता. त्यामुळे 2019 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा श्रेयवादाची लढाई रंगलेली दिसत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -