मुंबई : मुंबईतील अंधेरी एमआयडीसी भागातील कामगार रुग्णालयाच्या अग्नितांडवात तीन महिन्यांच्या चिमुकलीसह आठ जणांचा मृत्यू झाला असून 157 जण जखमी आहेत. जखमींमध्ये अग्निशनम दलाच्या तीन जवानांचाही समावेश आहे.
ईएसआयसी कामगार रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर सोमवारी (17 डिसेंबर) दुपारी शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती. रुग्णालयाला काचेची तावदानं असल्याने धूर कोंडला आणि त्यामुळे श्वास घेण्यास अडचण निर्माण झाल्याने या आठ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत 157 जण जखमी झाले आहेत. आग लागल्यानंतर भीतीपोटी एका महिला रुग्णाने वरच्या मजल्यावरुन उडी मारली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला.
22 जखमींवर अंधेरीच्या कूपर रुग्णालयात, 33 जणांवर जोगेश्वरीतील ठाकरे ट्रॉमा केअर सेंटरमध्ये, 48 जणांना अंधेरीच्या होली स्पिरीट, 65 जणांना अंधेरीच्याच सेव्हन हिल्समध्ये, 3 जखमींना पवईच्या हिरानंदानी रुग्णालयात, 2 जणांना गोरेगावच्या सिद्धार्थ रुग्णालयात तर एका जखमीला कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.
कामगार रुग्णालयात दुपारी चार वाजताच्या सुमारास आग लागली होती. चौथ्या मजल्यावरील ऑपरेशन थिएटरच्या जवळ शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीमुळे रुग्णालय परिसरात धुराचे प्रचंड लोट वाहत होते. धुरात गुदमरल्यामुळे मृत आणि जखमींचा आकडा वाढल्याची माहिती आहे.
अंधेरीतील कामगार रुग्णालयाच्या अग्नितांडवात सहा जणांचा मृत्यू
या रुग्णालयांमध्ये जखमींवर उपचार सुरु
1. कूपर रुग्णालय, अंधेरी पश्चिम - 24 जण - 2 मृत्यूमुखी (एक पुरुष-, एक महिला), 22 जणांवर उपचार
2. ठाकरे ट्रॉमा केअर सेंटर , जोगेश्वरी पश्चिम - 33 जण - 23 जणांवर उपचार , 10 जणांना डिस्चार्ज
3. होली हॉस्पिटल, अंधेरी पश्चिम - 48 जण - एकाचा मृत्यू (3 महिन्यांची मुलगी), 47 जणांवर उपचार
4. सेव्हन हिल्स हॉस्पिटल, अंधेरी पश्चिम - 65 जण - 4 जणांचा मृत्यू (आरासाम पुजाराम मनिषा कानगुतकर, तीर्थराज गुप्ता, चंद्रकांत म्हात्रे), 46 जणांवर उपचार (10 गंभीर), 15 जणांना डिस्चार्ज
5. हिरानंदानी हॉस्पिटल, पवई - 3 जण - दोघांवर आयसीयूमध्ये उपचार, एकाला डिस्चार्ज
6. सिद्धार्थ रुग्णालय, गोरेगाव - 2 जणांवर उपचार, प्रकृती स्थिर
7. शताब्दी रुग्णालय, कांदिवली - 1 एकाचा मृत्यू, (बाबू खान)
एकूण - 8 मृत्यूमुखी
कामगार रुग्णालयाचा गलथानपणा
- हॉस्पिटल प्रशासनाची अग्निरोधक यंत्रणा अद्ययावत नव्हती
- नोव्हेंबर 2018 मध्ये हॉस्पिटलकडे मुंबई महापालिकेच्या आपत्कालन विभागाने हॉस्पिटलमधील संपूर्ण यंत्रणेची माहिती मागितली होती. मात्र ही माहिती अद्यापही दिली गेली नाही. पालिकेने वारंवार विचारणा करुनही माहिती देण्यास टाळाटाळ.
- गेली दोन वर्ष हॉस्पिटलमधील स्टाफचं आपत्कालीन नियंत्रण/व्यवस्थापनाचे प्रशिक्षण झालेच नाही. हॉस्पिटल स्टाफला आपत्कालीन परिस्थिती कशी हाताळायची हे माहितीच नसल्याने मोठं नुकसान