पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रो 5 चं कल्याणमध्ये भूमिपूजन
एबीपी माझा वेब टीम | 18 Dec 2018 06:02 PM (IST)
छत्रपती शिवाजी महाराज, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज अशा महापुरुषांच्या नावांचा उल्लेख करत कल्याणमध्ये मेट्रो 5 च्या भूमिपूजनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली.
कल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कल्याण-भिवंडी-ठाणे मार्गाला जोडणाऱ्या मेट्रो 5 आणि मेट्रो 9 च्या मार्गाचं भूमिपूजन करण्यात आलं. मुंबईच्या विस्तारित भागाला जोडणारा हा फडणवीस सरकारचा महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्प मानला जातो. यावेळी मोदींनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. 2022-23 पर्यंत पावणेतीनशे किलोमीटरचे मेट्रो मार्ग उपलब्ध होतील, असा दावाही मोदींनी केला. छत्रपती शिवाजी महाराज, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज अशा महापुरुषांच्या नावांचा उल्लेख करत मोदींनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. छोट्या शहरातून आलेल्या लोकांची स्वप्नपूर्ती करण्याचं काम मुंबई-ठाणे या शहरांनी केलं. मुंबईत विकास होत आहे, पण पायाभूत सुविधांवर ताण वाढत आहे. म्हणूनच गेल्या साडेचार वर्षांत उपनगरातील भागांना जोडण्याचं काम आम्ही सुरु केलं, असं मोदी म्हणाले.