मुंबई : कोरोना व्हायरसविरोधात लढा देण्यासाठी पीएम केअर्स फंडमध्ये मदतीचा ओघ सुरु असताना या फंडच्या स्थापनेवरच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही पीएम केअर्स फंडवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. "पीएम केअर्स फंड सुरु करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेल्फ प्रमोशन करण्याची संधी सोडली नाही," अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. तसंच "प्रोत्साहन पॅकेजची घोषणा करताना जगातील कोणत्याही नेत्याने पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींचे पॅकेज असल्याचं म्हटलं नाही. मात्र भारतातील आर्थिक पॅकेज हे पंतप्रधान गरीब कल्याण नावाने दिलं जात आहे," असंही चव्हाण म्हणाले.

कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईसाठी मदतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम केअर्स फंडची स्थापना केल्याची घोषणा 28 मार्च रोजी केली. कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी पीएम केअर्स फंडमध्ये जास्तीत जास्त योगदान करण्याचं आवाहन मोदींनी केलं. यानंतर उद्योजकांपासून राजकारण्यांपर्यंत आणि खेळाडूं, कलाकारांपासून सामान्यांनी या फंडमध्ये भरघोस मदत केली.

पीएम केअर्स फंडची स्थापना एक स्वतंत्र पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून करण्यात आली आहे. प्राईम मिनिस्टर सिटीझन असिस्टन्स अॅण्ड रिलीफ इन इमर्जन्सी सिच्युएशन फंड (PM CARES Fund) असं या फंडचं पूर्ण नाव आहे.


पीएम केअर्सवर प्रश्न
परंतु या फंडच्या स्थापनेनंतर अनेकांनी त्यावर प्रश्न उपस्थित केले. देशात पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधी असताना नव्या पीएम केअर्स फंडची स्थापना करण्याची गरज काय असा सवाल विचारला जात आहे. काहींनी तर पीएम केअर्स फंड हा घोटाळा असल्याचंही म्हटलं आहे. हा फंड कॅगच्या कक्षेबाहेर असू शकतो, जेणेकरुन या फंडमधून केलेल्या खर्चावर तसंच वापरावर कोणाची नजर नसेल, म्हणूनच त्याची स्थापना झाल्याचा अंदाज काहींनी व्यक्त केला आहे.

मोदींनी सेल्फ प्रमोशनची संधी सोडली नाही : पृथ्वीराज चव्हाण
हाच धागा पकडत पृथ्वीराज चव्हाण यांनीही मोदींवर टीका केली आहे. "जवाहरलाल नेहरु यांनी जानेवारी 1948 मध्ये राष्ट्रीय सहाय्यता निधी PM National Relief Fund स्थापन केला. आतापर्यंत एकाही पंतप्रधानांना नवीन राष्ट्रीय निधी सुरु करण्याची गरज वाटली नाही. पण पीएम केअर्स फंड सुरु करुन नरेंद्र मोदी यांनी सेल्फ प्रमोशन करण्याची संधी सोडली नाही," असं ट्वीट पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.




आणखी एका ट्वीटमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत नुकतंच जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजच्या नवावरही आक्षेप घेतला आहे. त्यांनी लिहिलं आहे की, "जगातील कोणत्याही नेत्याने त्यांच्या देशात प्रोत्साहन पॅकेजची घोषणा करताना ते राष्ट्रपतींचे पॅकेज किंवा पंतप्रधानांचे पॅकेज किंवा ट्रंप पॅकेज असल्याचे म्हटलं नाही. पण आपल्या भारतात मात्र आर्थिक पॅकेज हे #PMGaribKalyan पॅकेज आहे."


पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीचं नाव बदलून पीएम केअर्स का केलं नाही? : शशी थरुर
काँग्रेस खासदार शशी थरुर यांनीही या फंडवर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी लिहिलं आहे की, "पंतप्रधानांचं शब्दावरील प्रेम पाहता त्यांनी पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीचं नाव बदलून पीएम केअर्स करता आलं असतं. पण नव्या ट्रस्टची स्थापना करण्याच्या आली आहे, ज्याच्या नियम आणि खर्चांबाबत कोणतीली स्पष्टता नाही. या असमान्य निर्णयासाठी तुम्हाला जनतेला उत्तर द्यावं लागेल. "


आधीचा फंड असताना पीएम केअर्स फंड कशाला? : रामचंद्र गुहा
तर प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनीही पीएम केअर्स फंडवर सवाल उपस्थित करत टीका केली आहे. प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनीही पीएम केअर्स फंडवर सवाल उपस्थित करत टीका केली आहे. पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधी असतानाही नवा फंड कशाला? वैयक्तिक प्रतिमा सुधारण्यासाठी देखील या राष्ट्रीय संकटाचा वापर करण्याची गरज आहे का?