मुंबई : मुंबईसह देशभरात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता संपूर्ण भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. सर्वत्र लागू केलेली संचारबंदी ही लोकांच्या हितासाठीच असताना काहीजण 'टिकटॉक'च्या माध्यमातून त्याची खिल्ली उडवत आहेत. एका अशाच टिकटॉक स्टार फैजल शेखसह इतरांविरोधात मुंबई पोलिसांत एक तक्रार देण्यात आली आहे. याआधीही पोलिसांनी यांच्यावर कारवाई केलेली आहे, मात्र हायकोर्टाच्या आदेशानंतर दोन आठवड्यांपूर्वीच गेले नऊ महिने बंद असलेलं हे अकाऊंट पुन्हा सुरू करण्यात आलं आहे.
फैजल शेख उर्फ मुदस्सर शेख या टिकटॉक स्टारचे भारतातच नव्हे तर परदेशातही लाखो चाहते आहेत. त्यानं नव्यानं अपलोड केलेल्या एका व्हिडिओत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागलेली असताना फैजल घराबाहेर पडून सलमान खानच्या 'किक' या सिनेमातील व्हिलन नवाझउद्दीन सिद्दीकीनं मारलेला डायलॉग, "मौत को छूकर वापस वापस आ सकता हू" यावर एक व्यंग सादर करताना दिसतोय.
मात्र फैजलनं केलेली ही कृती म्हणजे इतरांना अशा भयंकर परिस्थितीत बाहेर पडायला उद्युक्त करणारी आहे. असा आरोप करत मुंबईतील एक वकील अली काशिफ खान देशमुख यांनी मुंबई पोलिसांच्या सायबर सेल तसेच आंबोली पोलीस स्थानकांत तक्रार दाखल केली आहे. यात व्हिडिओ बनवणारे हसनैन शेख, सोहेल आणि फैज बलोच यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. मुंबई पोलीस यासंदर्भात आता अधिक तपास करत आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अश्याप्रकारचे आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट केल्याच्या कारणावरुन मुंबई पोलिसांनी हसनैन शेख, सोहेल आणि फैजचं टिकटॉक अकाऊंट याआधीही ब्लॉक केलेलं आहे. मात्र दोन आठवड्यांपूर्वीच या तिघांचं अकांउट पुन्हा खुलं करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे गेले नऊ महिने ऑफलाईन असलेल्या या टिकटॉकरांनी पुन्हा आपले व्यंगात्मक व्हिडीओ टाकण्यास सुरूवात केली आहे.
पाहा व्हिडीओ : कशी वाढवावी मनाची इम्युनिटी? अध्यात्मिक गुरु श्री शिवकृपानंद स्वामी माझावर
जुलै 2019 मध्ये मुंबई पोलिसांच्या सायबर सेलच्या विनंतीवरून यांचं टिकटॉक अकाऊंट निलंबित करण्यात आलं होतं. यांनी पोस्ट केलेले व्हिडीओ आक्षेपार्ह आणि सामाजिक अशांतता निर्माण करणारे आहेत, अशी तक्रार मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे करण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांनी तपासाअंती कारवाई करुन तिघांनाही टिकटॉकवर ब्लॉक करण्याची कारवाई केली होती. याच प्रकरणात तिघांनाही साल 2019 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीनही मंजूर झाला आहे.
संबंधित बातम्या :
‘जिआयएस मँपींग’द्वारे कोरानाग्रस्तांची परिसराची माहिती संकेतस्थळावर मिळणार; मंबई पालिकेचा निर्णय
Coronavirus | मुंबईत कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्वांना क्वॉरन्टाईन करणार : महापौर