मुंबई: डोंबिवली आणि कल्याणमध्ये अंड्यात प्लास्टिकसदृश पदार्थ निघाल्यानंतर आता अंबरनाथमध्ये अंड्यात चक्क पॉलिथिनचा तुकडा मिळाला.
अंबरनाथ पूर्व भागातील रॉयल पार्क भागात राहणाऱ्या प्रभा सोनावणे यांनी हा प्रकार समोर आणला.
आज सकाळी प्रभा सोनावणे यांनी त्यांच्या पतीच्या डब्यात देण्यासाठी अंड्याची भुर्जी केली. मात्र यावेळी या भुर्जीत चक्क पॉलिथिनचे तुकडे असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. त्यामुळे त्यांनी ही भुर्जी आणि अंड्याची टरफलं तशीच ठेवून दिली.
काही दिवसांपूर्वी डोंबिवली आणि कल्याणमध्येही अशाच प्रकारे अंड्यात प्लास्टिकसदृश पदार्थ निघाला होता. मात्र अन्न व औषध प्रशासनानं केलेल्या तपासणीत ते प्लास्टिक नसून उष्णतेमुळं अंड्यात तसा स्तर निर्माण होत असल्याचं सांगण्यात आलं होतं.
मात्र त्यानंतरही अशाच प्रकारे अंबरनाथमध्ये अंड्यात पॉलिथिनचा तुकडा आढळल्यानं अन्न औषध प्रशासन आणि अंडी विक्रेते यांचं काही गौडबंगाल तर नाही ना? असा सवाल उपस्थित झाला आहे.