मुंबई : ‘एक मराठा; लाख मराठा’ अशी घोषणा देत 9 ऑगस्टला मुंबईत मराठा क्रांती मूकमोर्चा निघणार आहे. त्याची जय्यत तयारी जशी मोर्चेकऱ्यांनी केली आहे, तशीच तयारी प्रशासनाकडूनही केली जात आहे.


मराठा आरक्षण, कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा, अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा अशा विविध मागण्यांची पुनरावृत्ती मुंबईतल्या मराठा क्रांती मोर्चाद्वारे करण्यात येणार आहे.

मोर्चासाठी संघटनांचं आवाहन
9 ऑगस्टला सकाळी 11 वाजता भायखळ्यातील जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्यात येणार आहे.

शाळांना सुट्टी

मराठा मोर्चामुळे वाहतुकीस अडचणी निर्माण झाल्यास, विद्यार्थी वाहतूक कोंडीमध्ये अडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईतील शाळा बंदचा निर्णय घेण्यात आला आहे, असं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केलं.

दक्षिण मुंबईतील सायन, माहिम, दादर, वरळी आणि भायखळा ते कुलाबा या परिसरातील शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत.

विविध जिल्ह्यातील मराठा बांधव एकवटणार
या मोर्चासाठी ठाणे, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, औरंगाबाद, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यातला मराठा बांधव एकवटणार आहे. त्यामुळे मुंबई आणि लगतच्या उपनगरामधील रेल्वे स्टेशनवर ‘रेल मराठा स्वयंसेवक’ तैनात ठेवण्यात येतील. तसंच मराठा मोर्चात सामील होणाऱ्या वाहनांसाठी बीपीटी सिमेंट यार्ड आणि वडाळा ट्रक टर्मिनल येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

मुंबईत आल्यानंतर मोर्चाच्या ठिकाणी कसं पोहोचाल?

मोर्चासाठी बाहेरुन येणाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी 5 हजार स्वयंसेवकाची फौज सज्ज असेल. पुणेमार्गे मुंबईत येणाऱ्या लोकांसाठी पनवेल, कामोठे, खारघर, बेलापूर, जुईनगर, सानपाडा, वाशी तसेच ठाणे ऑक्ट्रॉय नाका, भाईंदर या ठिकाणी विशेष सोय करण्यात आली आहे.



पार्किंगची व्यवस्था

पुणे, सातारा , सांगली , कोल्हापूर, अहमदनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मराठवाड्यातून येणाऱ्या मराठा क्रांती मोर्चेकरांना, नवी मुंबईतून मुंबईत जावे लागणार आहे.

नवी मुंबई लोकलच्या हार्बर रेल्वे मार्गावर आहे . मुंबई -पुणे महामार्गाला लागून सर्व रेल्वे स्टेशन आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकाच्या समोरील मैदानात वाहनांची पार्किंग करण्यात आली आहे. यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्याला रेल्वे स्थानके वाटून देण्यात आली आहेत.

कोणत्या जिल्ह्याला कुठे पार्किंग?

  • पुणे, सोलापूर - खारघर रेल्वे स्थानक, सेंट्रल पार्क मैदान

  • अहमदनगर - खांदेश्वर रेल्वे स्थानक

  • औरंगाबाद – मानसरोवर (कामोठे) रेल्वे स्थानक

  • रायगड,रत्नागिरी, सिंधुदुर्ग - नेरुळ, सीवूड रेल्वे स्थानक, तांडेल मैदान

  • बीड - सानपाडा रेल्वे स्थानक, दत्त मैदान .

  • परभणी - वाशी रेल्वे स्थानक - महाराष्ट्र सदन .


उत्तर महाराष्ट्रातून येणाऱ्या मोर्चेकऱ्यांसाठी पर्याय

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यातूनही मोर्चासाठी मुंबईत अनेक मराठा बांधव येणार आहेत. अहमदनगरकडून येणाऱ्या वाहनांसाठी मुरबाड येथे महामार्गालगत, कल्याणमध्ये बिर्ला कॉलेज मैदानात आणि डोंबिवलीत संत सावळाराम महाराज क्रीडा संकूल येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

नाशिककडून येणाऱ्या वाहनांसाठी शहापूर येथे महामार्गालगत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. ठाणे शहरात आनंदनगर जकात नाका येथील मैदानात मध्यवर्ती पार्किंग उभारण्यात आलं असून तिथे नाश्ता आणि मोबाईल टॉयलेटची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

उत्तर महाराष्ट्रातून आल्यानंतर भायखळ्याला ट्रेनने जाण्यासाठी मध्य रेल्वेने जावं लागेल. कल्याण, ठाणे या स्थानाकातून मध्य रेल्वेने जाता येईल. भायखळा स्टेशनला उतरल्यानंतर जवळच वीर जिजामात उद्यान आहे.

रात्री येणाऱ्यांनी फ्रेश कुठे व्हायचं?

सातारा, सांगली, कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून येणाऱ्या मोर्चेकऱ्यांची सोय वाशी एपीएमसी मार्केटमध्ये करण्यात आली आहे.

वाहने पार्किंग होण्याच्या ठिकाणी नवी मुंबई पालिकेने मोबाईल टॉयलेट वाहनांची सोय केली आहे.

फ्रेश होऊन, नाश्ता करुन हे लोक सानपाडा रेल्वे स्थानकात येऊन रेल्वेने मुंबईच्या दिशेने प्रवास करतील.

डिझास्टर मॅनेजमेंट सेल

या भव्य मोर्चासाठी मराठा संघटनांची जोरदार तयारी सुरु आहे. शिवाजी पार्कमध्ये मराठा संघटनांचं डिझास्टर मॅनेजमेंट सेल काम करतं आहे. ही टीम मराठा मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची काळजी घेणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने जय्यत तयारी

  • मुंबईत ठिकठिकाणी 8 आरोग्य कक्ष. प्रत्येक ठिकाणी 10 महिला डॉक्टर, 10 पुरुष डॉक्टर

  • आझाद मैदानाचे प्रवेशद्वार 40 फुटांपर्यंत मोठे करण्यात आले आहे.

  • आझाद मैदानात पिण्याच्या पाण्याचे टँकर्स, फिरती शौचालये, 10 महिलांसाठी, 10 पुरुषांसाठी

  • फायर इंजिन्सची व्यवस्था

  • आझाद मैदानावर गर्दी झाल्यास, बॉम्बे जिमखान्याचे मैदानही खुले करणार

  • ओसिएस वाहतूक चौक जंक्शन ते मेट्रो सिनेमा चौकापर्यंत भक्कम बॅरेकेटिंग


मराठा मोर्चासाठी मुंबईतील वाहतूक व्यवस्था

मोर्चा जिजामाता उद्यान ते आझाद मैदानापर्यंत असेल. मुंबईतील वाहतूक व्यवस्थेमध्ये उद्या सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत मोठे बदल करण्यात आले आहेत.

मोर्चा नियमनसाठी वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले रस्ते –
1. डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोडवरील दादर फायर ब्रिगेड जंक्शन ते जेजे फ्लायओव्हरपर्यंतचा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद असेल.
2. जे.जे. फ्लायओव्हरवरून दोन्ही बाजूनी येणारी-जाणाऱ्या मार्गिका सर्व प्रकारच्या वाहनांना बंद असतील.
3. कर्नाक बंदर ते कर्नाक ब्रिजकडे वाहतूक पूर्ण बंद.

पर्यायी मार्ग –
1. किंग्ससर्कलवरुन पी.डिमेलो रोडकडे जाणारी वाहतूक सुरु.
2. दादर टीटीवरुन डावीकडे जाणारी वाहतूक सुरु.
3. नायगाव क्रॉसरोडवरुन डावीकडे आरएकेवरुन चार रस्त्याला वाहतूक सुरु.
4. मॅडम कामा रोडवरुन हुतात्मा चौककडे उजवीकडे वळण घेऊऩ काळाघोडा मार्गे ओल्ड कस्टम हाऊसची वाहतूक सुरु
5. एन.एम.जोशी मार्ग ते लोअर परेल स्टेशन ते वरळी नाका-हाजी अली, पेडर रोड वाहतूक सुरु.
6. मरिन ड्राईव्हवरुन हाजी अली, सी लिंक किंवा ई मोजेस रोडवर सिद्धीविनायक ते सेनाभवन वाहतूक सुरु.

मराठा क्रांती मूक मोर्चाची आचारसंहिता

  • हा मूक मोर्चा आहे.मोर्चात चालत असताना एकमेकांशी बोलणार नाही,घोषणा देणार नाही.

  • मी मोर्चाचे गांभीर्य राखणार.कोणी घोषणा दिल्या तर त्याला तिथेच रोखणार.

  • मोर्चात अधिकृत बॅनर शिवाय कोणतेही वैयक्तिक/संस्था संघटनांच्या नावाने बॅनर्स लावणार नाही.

  • माझा मोर्चा कोणत्याही जाती-धर्माच्या विरोधात नाही. मराठ्यांच्या मागण्यासाठी व आत्मसन्मानासाठी आहे.

  • मोर्चात जास्तीत जास्त महिला सहभागी होण्यासाठी प्रयत्न करणार.

  • मोर्चामध्ये मी कुठल्याही पक्षाचा किंवा संस्थेचा नसून फक्त मराठा म्हणून येणार.

  • मोर्च्यांच्या दिवशी सकाळी ११:०० वा. कुटुंबासह दाखल होणार.

  • मोर्चात स्वयंशिस्त पाळून मराठा समाजाच्या सुसंस्कृतपणा दाखवणार, पोलिसांना सहकार्य करणार.

  • मोर्चात मी कोणतेही व्यसन करून सहभागी होणार नाही,कोणाला करूही देणार नाही.

  • महिला,लहान मुले व वृद्धांना सहकार्य करणार,माता,भगिनींना पुढे जाऊ देईन.

  • मला जिथे जागा मिळेल तिथूनच मी चालेल. मी घाई गडबड करणार नाही.

  • मोर्चाला अत्यंत शांततेत येणार व गावाकडे परत शांततेत जाणार.

  • कुणालाही त्रास होणार नाही असे माझे वर्तन राहील.

  • मोर्चात झालेला कचरा उचलून कचरा कुंडीत टाकणार,रिकाम्या पाण्याच्या बॉटल,पाऊच आणि पडलेले ग्लास गोळा करण्यासाठी प्रयत्न करणार.

  • स्वाभिमान,स्वावलंबन,शिक्षण, सहकार्य,जागृती या पंचसूत्रीचा समाजविकासासाठी अंगीकार करणार.




संबंधित बातम्या

मुंबईत आल्यानंतर मोर्चाच्या ठिकाणी कसं पोहोचाल?

मुंबईत मराठा मोर्चाला येताना तुमचं वाहन इथे पार्क करा!

मुंबई मराठा मोर्चा: तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं!