गुजरातमधील राज्यसभा निवडणुकीत ‘पक्षाने भाजपला मतदान करायला सांगितलं आहे,’ असा दावा गुजरातमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार कंधाल जडेजा यांनी केला आहे. त्यावर आमचा पाठिंबा अहमद पटेल यांनाच असल्याचं तारीक अन्वर यांनी स्पष्ट केलं.
गुजरातमध्ये राष्ट्रवादीचे दोन आमदार आहेत. राज्यसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास उरलेले असताना, कंधल जाडेजा यांचं वक्तव्य काँग्रेसच्या अहमद पटेल यांना मोठा धक्का असल्याचं म्हटलं जात होतं.
तर राष्ट्रवादी आपल्यालाच पाठिंबा देईल, असा विश्वास अहमद पटेल यांनी व्यक्त केला आहे. अहमद पटले हे सोनिया गांधींचे विश्वासू आणि स्वीय सचिव आहेत. आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतमोजणी पूर्ण झाल्यावर अंतिम निकाल हाती येतील.
शाह, इराणींचा विजय पक्का, पटेलांची वाट बिकट
दरम्यान, भाजपकडून अमित शहा, स्मृती इराणी यांचा विजय पक्का आहे. पण काँग्रेसचे फुटीर आमदार बलवंतसिंह राजपूत यांच्या रुपाने तिसरा उमेदवार रिंगणात उतरवून भाजपने अहमद पटेलांची पुरती नाकाबंदी केली आहे.
राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा, अहमद पटेलांना दे धक्का!
गुजरात विधानसभेतील स्थिती
गुजरात विधानसभेत एकूण 182 सदस्य आहेत. काँग्रेसच्या सहा आमदारांच्या राजीनाम्यानंतर आता विधानसभेत 176 आमदार आहेत. यामध्ये भाजपचे 121 आणि काँग्रेसचे 51 आमदार आहेत. विजयासाठी प्रत्येक उमेदवाराला कमीत कमी 45 आमदारांचं मत हवं आहे. भाजप आमदारांची संख्या पाहता अमित शाह आणि स्मृती इराणी याचा विजय निश्चित आहे. तर भाजपचे तिसरे उमेदवार बलवंत सिंह यांच्याकडे पक्षाच्या आकडेवारीनुसार केवळ 31 मतं आहेत. पण भाजप बाहेरील आमदारांची मतं आपल्या पारड्यात पाडून बलवंत सिंह यांच्या विजयाचा दावा करत आहे.
भाजपकडून वाघेलांच्या बंडाळीचा फायदा
शंकरसिंह वाघेला यांच्या बंडाळीचा फायदा घेत भाजपने काँग्रेसचे आतापर्यंत सहा आमदार फोडले आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या आमदारांची संख्या 57 वरुन 51 वर पोहचली आहे. अहमद पटेल यांना जिंकण्यासाठी पहिल्या पसंतीच्या 45 मतांची गरज आहे. काँग्रेसने आपल्या 44 आमदारांना गेल्या आठवडाभरापासून बंगळुरुच्या रिसॉर्टमध्ये ठेवलं होतं. या आमदारांना सोमवारी गुजरातमध्ये आणलं गेलं. आणंद इथल्या रिसॉर्टमध्ये त्यांची रवानगी करण्यात आली असून इथून थेट मतदानालाच त्यांना आणलं जाईल.
काँग्रेसचे जे आमदार बंगळुरुला गेले नाहीत ते भाजपला मत देण्याची शक्यता वर्तवली जात. यामध्ये काँग्रेस सोडलेले शंकर सिंह वाघेला आणि त्यांच्या समर्थक आमदारांचा समावेश आहे. मात्र ते आणि समर्थक आमदार कोणाला मत देणार याचा खुलासा शंकर सिंह वाघेला यांनी अद्याप केला नाही.
प्रतिष्ठेच्या लढतीत अहमद पटेलांची भिस्त राष्ट्रवादीवर