मुंबई : मुंबईतील सीएसएमटी भागातील हिमालय पूल दुर्घटनेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात एक नवीन याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेतून मृतांच्या नातेवाईकांना आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार प्रत्येकी एक कोटी रुपये तर अन्य जखमींना प्रत्येकी 25 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.
ज्येष्ठ वकील आणि माजी न्यायाधीश व्ही.पी. पाटील यांनी ही याचिका दाखल केली असून या आठवड्यात यावर सुनावणी होणं अपेक्षित आहे. याचिकाकर्त्यांनी या याचिकेत मुख्यमंत्री, पालिका आयुक्त, पालिकेचे अन्य संबंधित अधिकारी यांच्यासह मध्य रेल्वेचे व्यवस्थापक आणि मुंबईचे महापौर यांनाही प्रतिवादी करण्यात आलं आहे.
हायकोर्टाने दिलेल्या निर्देशांनुसार कर्तव्य बजावण्याऐवजी खोटा स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट सादर केल्याने ही दुर्दैवी घटना घडली आणि निर्दोष सर्वसामान्यांना आपला जीव गमवावा लागला, असा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे.
दरम्यान, स्ट्रक्चरल ऑडिटर नीरजकुमार देसाईला अटक करण्यात आली आहे. कलम 304 (2) अंतर्गत देसाईवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चुकीचा अहवाल सादर केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
14 मार्चला संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी घडलेल्या या दुर्घटनेमुळे सहा जणांना आपले प्राण गमवावे लागले, तर 31 जण जखमी झाले आहेत.
सीएसएमटी पूल दुर्घटना : मृतांच्या आप्तांना एक कोटी द्या, हायकोर्टात याचिका
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
18 Mar 2019 08:46 PM (IST)
सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी स्ट्रक्चरल ऑडिटर नीरजकुमार देसाईला अटक करण्यात आली आहे. चुकीचा अहवाल सादर केल्याचा ठपका ठेवत देसाईवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -