मुंबई : आज मध्यरात्री 12 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला मुंबईत पेट्रोल आणि डिझेल मिळणार नाही. मध्यरात्री पेट्रोल पंप बंद करण्याचा निर्णय मुंबई पेट्रोल-डिझेल असोसिएशनने घेतला आहे.
पंतप्रधान मोदींनी काळ्या पैशाविरोधात लढाईच्या दृष्टीने महत्त्वाचं पाऊल म्हणून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, हॉस्पिटल, रेल्वे, पेट्रोल पंप इत्यादी ठिकाणी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा आज मध्यरात्रीपर्यंत (11 नोव्हेंबर) चलनात राहतील, असेही सांगितले.
मोदींच्या निर्णयानुसार आज मध्यरात्रीपर्यंत पेट्रोल पंपावर 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जाणं बंधनकारक असेल. मात्र, या सर्व गोष्टींमुळे पेट्रोल पंपावर वाद होऊ शकतो, असा दावा करत मुंबई पेट्रोल-डिझेल पंप असोसिएशनने पेट्रोल पंप आज मध्यरात्री 12 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई पेट्रोल-डिझेल पंप असोसिएशनच्या या निर्णयामुळे आज मध्यरात्री 12 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत मुंबईकरांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही. मात्र, सकाळी 6 वाजल्यानंतर पेट्रोल पंप उघडतील आणि सर्व व्यवहार सुरळीत सुरु राहील.