ठाणे : ठाण्यातील बेकायदेशीर बांधकामांवर हातोडा चालवणारे सनदी अधिकारी आणि ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप जयस्वाल यांच्यावर या याचिकेमार्फत करण्यात आला आहे.


आरटीआय कार्यकर्ते विक्रांत कर्णिक यांनी ही याचिका हायकोर्टात दाखल केली. न्यायमूर्ती आर. एम. सावंत आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर ही याचिका सादर करण्यात आली असता हायकोर्टाने एसीपी पद्मजा चव्हाण यांना त्या 15 वर्षीय मुलीचा जबाब नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत.

या याचिकेतून जयस्वाल यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत. सदर मुलीकडून रात्री उशिरापर्यंत जयस्वाल बॉडी मसाज करुन घेत असत, असा उल्लेख या याचिकेत करण्यात आला आहे.

याबाबत मुलीच्या आईने मनपाडा पोलीस स्टेशन तसेच ठाणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी यासंदर्भात कोणतीच कारवाई केली नाही. याउलट पोलिसांत तक्रार दाखल केल्यामुळेच जयस्वाल यांनी सूड भावनेने तक्रारदार महिला राहत असलेली झोपडपट्टी तोडली, असा आरोप या याचिकेत करण्यात आलाय.

त्यामुळे या घटनेची दखल घेऊन संजीव जयस्वाल यांच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्ह्याची नोंद व्हावी आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त दर्जाच्या महिला अधिकाऱ्याकडून या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी प्रमुख मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.