नंदुरबार : राज्यात सर्वत्र तापमानात प्रचंड वाढ होताना पाहायला मिळत आहे. उष्णतेच्या झळांचा फटका राज्याच्या अनेक भागात दिसू लागला आहे.

सातपुड्याच्या पायथ्याशी असलेला नंदुरबार जिल्हा सध्या वाढत्या तापमानाचा बळी ठरला आहे. नंदुरबारमध्ये गेल्या 48 तासात सर्वाधिक 43.2 अंश तापमानाची नोंद झाली आहे.

मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानात अशी वाढ झालेली दिसत असल्याने पुढचा एप्रिल आणि मे महिना किती प्रखर असेल याबाबत नागरिक चिंतेत आहेत.

तर एकीकडे उन्हाच्या झळा बसत असताना उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात गारपीट आणि अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढच्या दोन दिवसात उत्तर महाराष्ट्रासह, विदर्भात गारपीट आणि अवकाळी पावसाचा अंदाज आहे. मात्र या दोन दिवसात हवामानात काही बदल झाले, तर कदाचित गारपिटीचं संकट टळू शकेल, अशीही माहिती आहे. त्यामुळे महाराष्ट्राला एकाच वेळी प्रचंड ऊन आणि गारपीट या दोन्हीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

सातारा, सांगलीत धुकं
सातारा जिल्ह्यातल्या प्रतापगड परिसरात धुक्याबरोबर गारठाही वाढला आहे. प्रतापगडाच्या पायथ्याला आज सकाळपासून दाट धुकं पसरलं होतं. धुक्यामुळे प्रतापगडाच्या सौंदर्यात भर पडली आहे. प्रतापगडकडे जाणारे रस्तेही धुक्यात न्हाऊन निघाले आहेत. त्यामुळे रस्त्यांवरची वाहतूक मंदावली आहे.

तसंच सांगली शहरातही पहाटेच्या वेळी दाट धुकं पसरलेलं पाहायला मिळालं. गेल्या दोन दिवसांपासून शहरात ही परिस्थिती कायम आहे. शहरातले मुख्य रस्ते धुक्यात हरवून गेले आहेत. दाट धुक्यामुळे वाहन चालवताना चालक खबरदारी घेत आहेत.

संबंधित बातम्या

मुंबईसह राज्याचा पारा आणखी वाढणार

उत्तर-मध्य महाराष्ट्र, विदर्भात बुधवारी गारपिटीचा इशारा

अकोला 'हॉट', देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद