कायद्याचं उल्लंघन करुन विद्यार्थ्यांचा वैयक्तिक डेटा लीक होत असल्याचं पालक आणि पालक संघटनांनी समोर आणलं आहे. अनेक नामांकित शाळा वैयक्तिक माहिती या कोचिंग क्लासेसला पुरवत असल्याचा आरोप केला जात आहे.
आपल्या पाल्याची सर्व वैयक्तिक माहिती कोचिंग क्लास चालकांना माहित होत असल्याची तक्रार गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबईतील अनेक पालक करत आहेत. कोचिंग क्लासेसकडे ही माहिती कुठून आली, याबाबत विचारणा केली, तरी त्यांनी कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही.
अनेक नामांकित शाळांनी आपलं अॅप तयार केलं असून त्यात विद्यार्थ्यांची सर्व वैयक्तिक माहिती भरुन घेतली जाते. त्यामुळे हा डेटा कोचिंग क्लासेसच्या हाती तर लागत नाही ना ? याबाबत पालकामध्ये संभ्रम आहे. शाळासुद्धा याबाबत नकार देत असल्यामुळे हा डेटा लीक कसा झाला? याबाबत पालकांनी आता आवाज उठवला आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा निर्देशनुसार विद्यार्थ्यांचा आधारकार्ड क्रमांक किंवा आधारकार्ड वरील माहिती कुठेही लीक होऊ देता येत नाहीत. तरीही हा प्रकार घडत असल्यामुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
राष्ट्रीय बाल हक्क आयोगाकडे याबाबत आज तक्रार करणार असून लवकरात लवकर हा डेटा कसा लीक होत आहे याची माहिती शासनाने लक्ष घालून द्यावी, अशी मागणी पालक संघटनांनी केली आहे.