भिवंडी : व्हॉट्सअॅपवरुन प्रश्नपत्रिका व्हायरल होऊ नये म्हणून राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे विशेष काळजी घेण्यात येत असली, तरी हे प्रकार पूर्णपणे रोखण्यात अजूनही अपयश येत आहे. दहावीच्या परीक्षा सुरु असताना गेल्या दोन दिवसात दोन वेळा पेपर फुटल्याचा प्रकार भिवंडीत घडला आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांचा आज समाजशास्त्र विषयाचा पेपर होता, मात्र परीक्षा सुरु होण्याच्या अर्धा तास आधीच संपूर्ण पेपर व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. 15 मार्च आणि 18 मार्चला विज्ञानाचे पेपर फुटल्याचे प्रकार समोर आले होते. त्यासंदर्भात भिवंडी पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल आहे. यावर कारवाई होण्यापूर्वीच पुन्हा व्हॉट्सअॅपवर पेपर फुटला. भिवंडीतील नारपोली पोलिसात या प्रकरणी तक्रार करण्यात आली आहे.

भिवंडी तालुक्यातील काल्हेरमध्ये शेतकरी उन्नती मंडळाच्या परशुराम धोंडू टावरे विद्यालयाबाहेर रिक्षात बसलेल्या तीन विद्यार्थिनी परीक्षेची वेळ झाली, तरी परीक्षा केंद्रात येत नसल्याने शिक्षिका विद्या पाटील यांना संशय आला. त्यांनी तपासलं असता विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये 'Toppers Grops' या नावाने प्रश्नपत्रिका आढळून आली, त्यामुळे त्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले.

परीक्षा सुरु झाल्यावर आणखी तीन विद्यार्थिनींची तपासणी केली असता त्यांच्या मोबाईलमध्येही तोच प्रकार आढळून आला.
या सहा विद्यार्थिनी राहनाळ येथील होली मेरी कॉन्व्हेंट स्कूलच्या इंग्रजी माध्यमाच्या आहेत. सध्या या संदर्भात नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींवर कारवाई करणार असल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त नितीन कौसडीकर यांनी दिली