मुंबई : मुंबईतील एलफिन्स्टन स्टेशनवरील फुटओव्हर ब्रिजवर झालेल्या चेंगराचेंगरीत 23 जणांनी जीव गमावला. मात्र या घटनेचा एक छोटीशी अफवा जबाबदार होती, असा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. फुलं पडली या ऐवजी पूल पडला असं ऐकण्यात आलं आणि गैरसमज होऊन सर्वांनी धावपळ सुरु केली. त्यामुळे ही घटना घडली, असा दावा या दुर्घटनेत वाचलेल्या शिल्पा विश्वकर्मा या विद्यार्थिनीने केला आहे.


पाऊस, त्यामुळे पादचारी पुलावर झालेली गर्दी आणि त्यातच पूल पडल्याची अफवा, हे चेंगराचेंगरीचं कारण पश्चिम रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात फुलं वाहून नेण्यात येत होती. पायऱ्यांवर फुलं पडली होती. फुलं पडली हे पूल पडला असं ऐकण्यात आलं आणि एकच गोंधळ उडाला.

शिल्पा नेहमीप्रमाणे विले पार्ले येथे अभियांत्रिकीच्या क्लाससाठी चालली होती. पाऊस असल्यामुळे पुलाचा आधार घेत सर्व जण चालले होते. पुलाच्या तिकीट खिडकीकडील भागाकडे डोक्यावर फुलं वाहून नेणारी एक व्यक्ती होती. डोक्यावरील गोणीतून फुलं पडताच ‘फुलं पडली’ असा आवाज आला. मात्र काहींना फुलांऐवजी पूल पडला असा गैरसमज निर्माण होऊन गोंधळ उडाला.

या सर्व गोंधळात एका व्यक्तीचा पाय सरकला आणि अनेक जण हळूहळू एकमेकांवर पडू लागल्याचं शिल्पाने सांगितलं. सकाळी 10.15  च्या सुमारास उडालेल्या या गोंधळानंतर चेंगराचेंगरी सुरू झाली, अशी माहिती शिल्पाने दिली. याच चेंगराचेंगरीने 23 जणांचा जीव घेतला.

चेंगराचेंगरीत मुंबईकरांचा बळी

एलफिन्स्टन आणि परेल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर शुक्रवारी सकाळी मोठी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 23 जणांचा मृत्यू झाला, तर 39 प्रवासी जखमी झाले. सकाळी 9.30 च्या सुमारास फूट ओव्हर ब्रीजवरील पत्रा कोसळल्याची ओरड झाली. यामुळे ब्रीजवरील प्रवाशांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं. त्यातच ब्रीज पडत असल्याच्या आणि शॉर्ट सर्किट झाल्याच्या अफवा पसरल्या. त्यामुळे ब्रीजवरील प्रवाशांमध्ये एकच हलकल्लोळ माजला.