मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. पोकळ आश्वासने दाखवणाऱ्या नेत्यांना जनता झोडपून काढते, असं वक्तव्य करत नितीन गडकरी यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

गडकरींनी हे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून तर केले नाही अशा चर्चा दबक्या आवाजात सुरु झाल्या आहेत. मुंबईत भारतीय जनता पक्षाच्या नवभारतीय शिववाहतूक संघटनेच्या बोधचिन्ह आणि वेबसाईटचं अनावरण झालं, त्या कार्यक्रमात ते बोलत होते.

"स्वप्न दाखवणारे राजकीय नेते लोकांना चांगले वाटतात. मात्र दाखवलेले स्वप्न पूर्ण नाही झाले तर जनता त्यांना धडाही शिकवते. त्यामुळे स्वप्न तीच दाखवली पाहिजेत जी पूर्ण होऊ शकतील. मी स्वप्न दाखवणाऱ्यांपैकी नाही. मी जे बोलतो ते करुनच दाखवतो. त्याबाबत मला कुणीही प्रश्न विचारु शकणार नाही," असं नितीन गडकरी म्हणाले.

मात्र नितीन गडकरींच्या या वक्तव्यानंतर त्यांचा इशारा मोदींकडे तर नाही ना असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, याच कार्यक्रमात अभिनेत्री ईशा कोप्पीकर भाजपमध्ये प्रवेश केला. ईशा कोप्पीकरला या वाहतूक संघटनेची जबाबदारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

व्हिडीओ