मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबईकर ज्या पेंग्विन्सच्या दर्शनाची वाट पाहत होते, त्यांची झलक अखेर पाहायला मिळणार आहे. येत्या दोन दिवसात मुंबईतील राणीच्या बागेमधल्या एक्झीबिट एरियात या पेंग्विनना आणण्यात येईल.
राणीच्या बागेतच पेंग्विन्ससाठी क्वारंटाईन एरिया तयार करण्यात आला होता. तिथे पेंग्विन्ससाठी पोषक असं शीत वातावरण तयार करण्यात आलं होतं. तिथून त्यांना दर्शनी भागात नेलं जाणार आहे. पेंग्विन्सच्या वाढीसाठी आणि सुरक्षेसाठी लाखो रुपये खर्च करुन खास व्यवस्था करण्यात आली होती.
दक्षिण कोरियाच्या सेऊलमधील कोएक्स अॅक्वेरिअममधून मुंबईतील जिजामाता उद्यानात एकूण आठ पेंग्विन आणण्यात आले होते. यापैकी एका मादी पेंग्विनचा यकृतातील जीवाणू संसर्गामुळे गेल्या वर्षी 23 ऑक्टोबरला मृत्यू झाला होता.
26 जुलै 2016 रोजी पहिल्या टप्प्यात आणण्यात आलेल्या या पेंग्विन्समध्ये 3 नर आणि 5 मादींचा समावेश होता. राणीच्या बागेतील क्वारेंटाईनमध्ये सर्व पेंग्विनना ठेवण्यात आलं होतं. दक्षिण कोरियासारखं तापमानही राणीच्या बागेत तयार करण्यात आलं आहे. वॉटर क्वॉलिटीही पेंग्विनला अनुकूल ठेवण्यात येत आहे.
पेंग्विनची काळजी घेण्यासाठी गोवा ट्रेड फार्मिंग कंपनी, थायलंड या एजन्सीला तीन महिन्यांसाठी केअर टेकींगचं कंत्राटही देण्यात आलं होतं.