ठाणे : सैन्यभरतीचा पेपर फुटल्याप्रकरणी ठाणे क्राईम ब्रांचने देशभरात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत 18 आरोपींसह 350 विद्यार्थ्यांना अटक केली आहे. अटक झालेल्या आरोपींमध्ये सैन्याशी निगडीत काही जणांचा समावेश आहे.
रविवारी नियोजित असलेल्या सैन्यभरतीचे पेपर आधीच फुटल्यानं देशभरात अटकसत्र सुरु झालं आहे. पहाटे ठाणे क्राईम ब्रांचने नागपूर, पुणे आणि गोव्यातून अनेक विद्यार्थी आणि दलालांना अटक केली आहे.
नागपूरच्या पार्वती नगर येथील मौर्य सभागृहातून पहाटे 4 वाजताच्या सुमारास ठाणे क्राईम ब्रांचच्या पथकानं आरोपींना ताब्यात घेतलं आहे. तर पुण्याच्या हडपसरमधून दोन जणांना अटक केली आहे. या दोघांनी 70 जणांना प्रत्येकी तीन लाख रुपयांत पेपर वाटल्याची माहिती आहे.
रविवारी सकाळी 9 वाजता सैन्य भरतीचा पेपर देशभरातल्या विविध ठिकाणी घेतला गेला. त्यासाठी आदल्या दिवशी अनेक विद्यार्थी नागपुरात आले होते. त्यापैकी सुमारे 60 विद्यार्थी हे मौर्य सभागृहात थांबले होते.
पुण्यातही पेपरफुटी प्रकरणी दोन जण अटकेत असून सहा जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. रात्रीपासून आलेली ठाणे पोलिसांची टीम अद्यापही हडपसर पोलिस स्टेशनमध्येच आहे. अटकेतील व ताब्यातील अशा सर्व 8 जणांची कसून चौकशी सुरु आहे. मुख्य आरोपी धनाजी जाधव याची फलटण येथे स्वत:ची ट्रेनिंग अॅकॅडमी आहे.
आदल्या दिवशी रात्रीच परीक्षेचा पेपर काही जण लिहित असल्याची माहिती ठाणे पोलिसांना मिळाली होती. हॉटेल आणि लॉजमध्ये विद्यार्थ्यांना गोळा करुन आरोपी त्यांच्याकडून पेपर लिहून घेत होते.
काही दलालांनी विद्यार्थ्यांना या भरती परीक्षेचे पेपर मिळवून देण्याचे आमिष दाखवत त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली. मात्र त्याआधीच पोलिसांनी धाड टाकून अनेकांना ताब्यात घेतलं.