मुंबई : मागील तीन महिन्यांचे थकलेले वेतन त्वरित मिळावं या मागणीसाठी आज एसटी महामंडळातील निर्भया समितीच्या महिला सदस्यांनी मुख्यमंत्र्यांसह परिवहन मंत्री अनिल परब यांना राखीसोबत मागण्यांचं निवेदन पाठवलं. यंदाच्या रक्षाबंधनची ओवाळणी म्हणून कर्मचाऱ्यांना मागील तीन महिन्यांचे थकलेले वेतन द्यावे, अशी विनंती यानिमित्ताने या महिला कर्मचाऱ्यांनी केली आहे.
एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे मे महिन्यांचे अर्धे वेतन आणि जून-जुलै महिन्यांचे पुर्ण वेतन थकलेले आहे. याबाबत वारंवार राज्यातील वेगवेगळ्या संघटनांनी अनेक निवेदनं देखील दिली आहेत. परंतु, अद्याप वेतनाचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे आज एसटी महामंडळातील निर्भया समितीच्या सदस्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना पोस्टाने राखी पाठवली आणि सोबत मागणीचे निवेदन देखील पाठवले आहे. याबाबत बोलताना एसटी कामगार संघटनेच्या राज्य महिला संघटक शीला नायकवडे म्हणाल्या की, सध्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक कर्मचाऱ्यांना कुटुंब चालवण्यासाठी वेगळे व्यवसाय करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे रक्षाबंधनच्या निमित्ताने मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांनी एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे कुटुंब चालवण्यासाठी वेतन देण्याबाबतचा निर्णय घ्यावा. हीच खरी आमच्यासाठी ओवाळणी ठरेल.
मुंबईत 5 ऑगस्टपासून सर्व दुकानं सकाळी 9 ते संध्याकाळी 7 या वेळेत उघडणार
तीन महिन्यांपासून पगार नाही; कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ
आधीच तोट्यात गेलेले एसटीचे चाक अधिकच खोलात गेले आहे. राज्यातील रेड आणि कंटेन्मेंट झोन वगळता एसटीची जिल्हांतर्गत वाहतूक सुरु आहे. परंतु त्याकडे देखील प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. प्रवाशी उत्पन्न मिळतं नसल्यामुळे एसटीतील कर्मचाऱ्यांना मागील तीन महिन्यांपासून वेतन देण्यात आलेलं नाही. आधीच कर्मचाऱ्यांना कमी पगार आहे. त्यात मागील तीन महिन्यांपासून पगार नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांची उपासमार सुरू आहे. त्यातच महामंडळाकडून रोज नवनवीन परिपत्रके काढून कर्मचाऱ्यांचे खच्चीकरण करण्यात येतं आहे. त्यामुळे एसटी महामंडळातील सर्व विभागातून सर्व निर्भया प्रमुखांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब यांना राखी आणि मागण्यांचे निवेदन पाठवलं आहे.
कामगारांना लवकरच पगार देण्याबाबत शरद पवार यांचे आश्वासन
याबाबत बोलताना एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे म्हणाले की, शरद पवार यांनी कामगारांना लवकरच पगार देण्याबाबतचे आश्वासन दिलं आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या आश्वासनानंतर रखडलेल्या पगाराचा तिढा नक्कीच सुटेल. तसेच एसटी महामंडळाकडून अत्यावश्यक सेवेतील महापालिका कर्मचाऱ्यांना मोफत प्रवासाची सवलत देण्यात आली होती, यासोबतच टाळेबंदीत मजुरांना त्यांच्या राज्याच्या बोर्डरवर पाठवण्यात आले होते. विविध राज्यांत अडकलेल्या अनेक विद्यार्थ्यांना देखील पुन्हा महाराष्ट्रात आणले होते. ही रक्कम एसटी महामंडळाला सरकारकडून येणं बाकी आहे. ती लवकरात लवकर द्यावी. तसेच महापालिकांनी देखील अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर, कर्मचारी यांना सोडले होते. ती देखील रक्कम लवकरात लवकर एसटी महामंडळाला द्यावी. त्यामुळे महामंडळातील रखडलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार लवकरात लवकर होतील.
सध्याच्या कोरोना व्हायरसच्या या महाभयंकर कालावधीत कर्मचाऱ्यांना पगार मिळाले नाहित तर त्यांचं जगणं अवघड होऊन जाईल. कर्मचाऱ्यांना पगार नसल्यामुळे अनेक कुटुंब उपाशी आहेत. त्यांना कुटुंब जगवण्यासाठी पगार मिळण गरजेचं आहे. एसटी महामंडळाने लवकरात लवकर तोडगा काढावा आणि कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा. जर पगार मिळाला नाही तर भविष्यात काही अनुचित घटना घडली तर त्याला महामंडळ जबाबदार असेल.
Raksha Bandhan 2020 | वर्दीतलं रक्षाबंधन; कोरोनाकाळात पुणे पोलीसात अहोरात्र झटणारे बहिण-भाऊ