मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात आता विविध नेत्यांनी उडी घेतल्याने या प्रकरणाला राजकीय रंगही चढले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सुशात सिंह मृत्यूच्या तपासावरुन टीका केली. मुंबईने माणुसकी गमावली असून निरपराध आणि स्वाभिमानी लोकांसाठी राहण्यासाठी हे शहर सुरक्षित नसल्याचं ट्वीट त्यांनी केलं आहे. याला युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई आणि राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी प्रत्युत्तर दिलंय.


सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आता भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा वाद रंगण्याची चिन्ह आहेत. कारण, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाटण्याहून मुंबईत आलेले पोलीस अधीक्षक विनय तिवारी यांना मुंबई महापालिकेने क्वॉरन्टाईन केलं. त्यावर बरीच चर्चा सुरु आहे. शिवाय बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. भाजप नेते राम कदम, किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी तपास यंत्रणेवर टीका केली. त्यातच आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही वक्तव्य करुन या प्रकरणात उडी घेतली आहे.


अमृता फडणवीस यांनी लिहिलं आहे की, "ज्या प्रकारे सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण हाताळलं जात आहे, ते पाहून मला वाटतंय की मुंबईने माणुसकी गमावली आहे आणि निरपराध, स्वाभिमानी लोकांना राहण्यासाठी हे शहर सुरक्षित नाही. " या आरोपाला शिवसेनेने जोरदार प्रत्युत्तर दिलंय.





वरुण सरदेसाई यांचा अमृता फडणवीसांवर निशाणा
दरम्यान युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी अमृता फडणवीस यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी याबाबत ट्वीट केलं आहे. "मॅडम, तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय ह्याच मुंबई पोलिसांची Security Cover घेऊन त्यांच्यावर इतके नीच आरोप करता?? सोडून द्या की security cover भरोसा नसेल तर," असं त्यांनी लिहिलं आहे.





"मुंबई पोलिसांवर आरोप करुन त्यांना बदनाम करणाऱ्या भाजप नेत्यांना आव्हान करते, की त्यांनी मुंबई पोलिसांनी दिलेली सुरक्षा व्यवस्था सोडून द्यावी आणि खाजगी संस्थांची सुरक्षा घ्यावी. माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने असे बोलणे दुर्दैवी आहे" असे ट्वीट राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केलं आहे.




CM Meeting | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक, सुशांत आत्महत्याप्रकरणी चर्चेची शक्यता