मुंबई : मुंबईत  येत्या 5 ऑगस्टपासून सर्व दुकानं सकाळी 9 ते संध्याकाळी 7 या वेळेत खुली राहणार आहेत. लॉकडाऊनमध्ये सम-विषम तत्त्वावर दुकाने सुरू होती. मिशन बिगिन अगेन अंतर्गत सर्व दुकाने खुली करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ही दुकाने सकाळी 9 ते संध्याकाळी 7 या वेळेत खुली राहणार आहेत. मुंबई महापालिकेनं याबाबतचं परिपत्रक काढलं आहे.


महत्वाचं म्हणजे मद्यविक्रीच्या दुकानांचाही यात समावेश आहे. मद्य घरपोच देता येण्याची सुविधाही देण्यात आलीय. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून मद्यविक्री करता येणार आहे. कोणत्याही नियमाचा भंग केल्यास कारवाईचा इशारा महापालिकेनं दिला आहे. मॉल्स आणि कॉम्प्लेक्समधली दुकानंही उघडण्यास संमती देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.


दरम्यान, मुंबईत रुग्ण वाढीचा सरासरी दर आता 1 टक्क्यापेक्षाही कमी झाला आहे. तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 70 दिवसांच्या पार गेला आहे. एवढेच नव्हे तर, मुंबईत कोरोनाची लागण तपासण्यासाठी करण्यात येणाऱ्या चाचण्यांनी 5 लाखांचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे दिनांक 28 जुलै 2020 रोजी एकाच दिवसात 11 हजार 643 चाचण्या करण्यात आल्या असून हा मुंबईतील एका दिवसातील चाचण्यांचा आतापर्यंतचा उच्चांकदेखील आहे.