मुंबई : शिवाजी पार्कात मुंबई महापालिकेने उभारलेला मंडप कोसळला असून, यात काहीजण जखमी झाल्याची माहिती मिळते आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 61 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यभरातून आणि परराज्यातूनही भीमसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. अनेकजण दादरमधील शिवाजी पार्कात थांबले आहेत.

शिवाजी पार्कात मंडप कोसळल्याने जखमी झालेल्यांना सायन हॉस्पिटलला उपचारासाठी नेण्यात आले आहे.

यावेळी योग्य व्यवस्था न केल्याचा आरोप करत भीमसैनिकांनी मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबईच्या महापौरांविरोधात घोषणाबाजी केली.

दरम्यान, भीमसैनिकांनी मैदानाऐवजी महापालिकेच्या शाळांमध्ये थांबावं, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ओखी चक्रीवादळामुळे मुंबईत सुरु असलेल्या संततधार पावसामुळे शिवाजी पार्कमध्ये चिखल झाला आहे. त्यामुळे देशभरातून आलेल्या भीमबांधवांची काही प्रमाणात गैरसोय होत आहे.

पाहा व्हिडीओ :



70 शाळांमध्ये राहण्याची सोय

ओखी वादळ आणि पावसामुळे परिस्थिती बिकट झाल्याने मुंबईबाहेरुन आलेल्या अनुयायांची राहण्याची सोय यंदा शिवाजी पार्कमधील शेल्टरऐवजी महापालिकेच्या 70 शाळांमध्ये करण्यात आली आहे.

बेस्टच्या अतिरिक्त बस

ओखीचा परिणाम उद्यापर्यंत कायम राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी येणाऱ्यांची गर्दी मात्र जास्त असेल. त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी शिवाजी पार्क परिसरात खासगी बस, बेस्ट बस सोडण्यात येत आहेत.

समुद्रकिनारी कडेकोट पोलिस बंदोबस्त

दादरचा समुद्रकिनारा पोलिसांनी वेढलेले आहेत. नागरिकांना सूचना देण्यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. समुद्राला उधाण आल्याने कोणीही किनाऱ्यावर जाऊ नये, यासाठी फेन्सिंगही टाकण्यात आलं आहे.