मुंबई : हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना रुग्णांच्या नातेवाइकांकडून होणाऱ्या मारहाणीचे प्रकार आपण नेहमीच ऐकत असतो. अशा घटनांना विरोध करण्यासाठी अनेकदा आंदोलनेही करण्यात आली आहेत. परंतु असे असतानादेखील डॉक्टरांना मारहाण होण्याचे प्रकार काही थांबताना दिसत नाही.

भिवंडी शहरातील नारपोली पोलीस ठाण्याअंतर्गत देवजी नगर परिसरात असलेल्या स्व. काशिनाथ पाटील रुग्णालयात मुस्तफा खान नामक एका तरुणाला जखमी अवस्थेत अज्ञात इसमाने उपचाराकरता दाखल केले होते. परंतु या तरुणाची परिस्थिती गंभीर असल्यामुळे डॉक्टरांनी त्याला आयसीयूमध्ये दाखल केले.

काही वेळानंतर त्या जखमी तरुणाचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये आले. रुग्णालयाच्या आयसीयू वार्डमध्ये मुस्तफाच्या नातेवाईकांची गर्दी खूप वाढू लागली. त्यामुळे आयसीयूमधील इतर रुग्णांना त्याचा त्रास होऊ लागला होता. ते पाहून डॉक्टरांनी मुस्तफाच्या नातेवाईकांना आयसीयूमधून बाहेर जाण्यास सांगितले.

डॉक्टरांनी मुस्तफाच्या नातेवाईकांना आयसीयूमधून बाहेर जाण्यास सांगितल्यानंतर मुस्तफा आणि त्याच्या नातेवाईकांनी डॉक्टरांशी बाचाबाची सुरु केली. पाहता-पाहता हाणामारीत सुरु झाली. मुस्तफा खान आणि त्यांच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये तोडफोड करायला सुरुवात केली. शिवाय मध्यस्ती करण्यासाठी आलेल्या डॉ शाहीद अली खान, डॉ स्वाती शाहिद खान, विठोबा पाटील, कैलास म्हात्रे आणि इतर 5 ते 10 कर्मचाऱ्यांना मारहाण केली.

घटनेचा संपूर्ण प्रकार हॉस्पिटलमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कँमेरामध्ये कैद झाला आहे. या घटनेची नोंद नारपोली पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत आहेत. पोलिसांनी सध्या मुस्तफा खानला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे