'वरळी विभाग, वार्ड किंवा विधानसभा क्षेत्रात मला काम करायला आवडतं', विधानसभा उमेदवारीबाबत आदित्य ठाकरेंचे सूचक विधान
एबीपी माझा वेब टीम | 30 Jul 2019 08:38 PM (IST)
'मी वरळी विभागात वारंवार येत असतो मला इकडे यायला आवडतं. वरळी विभाग असेल, वार्ड असेल किंवा विधानसभा क्षेत्र असेल इकडे मला काम करायला खुप आवडतं', असं आदित्य ठाकरे म्हणाले.
मुंबई : "वरळी विभाग, वार्ड असेल किंवा विधानसभा क्षेत्र इकडे मला काम करायला खुप आवडतं, मला इकडे यायला आवडतं", असं सूचक वक्तव्य युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. आदित्य यांच्या या वक्तव्यानंतर ते विधानसभा निवडणूक लढवणार का या चर्चेला जोरदार सुरुवात झाली आहे. वरळी येथे संकल्प प्रतिष्ठान आयोजित स्कूल बसच्या उद्धाटन प्रसंगी आदित्य ठाकरे बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून निवडणुक लढवणार अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. यावेळी आदित्य यांनी वरळीतील कार्यक्रमाला हजेरी लावली असताना 'मी वरळी विभागात वारंवार येत असतो मला इकडे यायला आवडतं. वरळी विभाग असेल, वार्ड असेल किंवा विधानसभा क्षेत्र असेल इकडे मला काम करायला खुप आवडतं', असं आदित्य ठाकरे म्हणाले. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या सचिन अहिर यांनी 'कायम स्वरूपी या' असा आवाज दिला. त्यामुळे या स्कूल बसच्या उद्घाटन सोहळ्याला स्थानिक आमदार सुनिल शिंदे, नगरसेवक आशिष चेंबुरकर, माजी मंत्री सचिन अहिर, संगीता अहिर हे देखील उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी आदित्य ठाकरे सध्या राज्यात ठिकठिकाणी फिरत आहेत. जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे जनतेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे राज्यभर शिवसेनेसाठी फिरतानाच आदित्य ठाकरे स्वतःदेखील विधानसभा निवडणूक लढवतील अशी देखील जोरदार चर्चा आहे. आदित्य ठाकरेंचा राजमार्ग वरळीतून जाणार?