भिवंडी (ठाणे) : मुंबई-ठाण्यासारख्या मेट्रोसिटी जवळ असूनही केवळ रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्याने आयुष्याला मुकावं लागलं आहे. भिवंडी शहरात वीटभट्टी कामगाराचा रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने मृत्यू झाला. काशिनाथ मंगल्या पवार असे या 26 वर्षीय वीटभट्टी कामगाराचे नाव आहे.


काशिनाथ पवार हा वीटभट्टी कामगार टेंभीवली गावात राहत होता. आज सकाळी काशिनाथने घरातील वादातून मुंग्या मारण्याचे औषध प्यायल्याने घेतल्याने त्याची प्रकृती बिघडली. स्थानिकांनी त्याला उपचारासाठी भिवंडीतील सरकारी रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी काशिनाथवर उपचार सुरु केले. मात्र परिस्थिती हाताबाहेर गेल्याने डॉक्टरांनी काशिनाथला ठाणे सिव्हिल रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान काशिनाथला ठाणे सिव्हिल रुग्णालयात नेण्यासाठी इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात एकही रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. डॉक्टरांनी 108 नंबरवरुन रुग्णवाहिकेसाठी संपर्क साधला. मात्र एक ते दीड तास उलटूनही 108 नंबरची रुग्णवाहिकेची सेवा न मिळाल्याने काशिनाथला वार्डबॉयच्या सहाय्याने एका डंपरच्या माध्यमातून ठाणे सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आले.

उपजिल्हा रुग्णालयाकडे रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याबाबत रुग्णालयाच्या सीएमओना विचारणा केली. त्यावेळी त्यांनी सांगितले, “रुग्णालयात फक्त  चार रुग्णवाहिका असून त्यापैकी दोन रुग्णवाहिका बंद आहेत, तर इतर रुग्णवाहिकांमध्ये बिघाड झाल्याने दुरुस्तीसाठी दिलेल्या आहेत.”

मुंबई-ठाण्यासारखी मेट्रो शहरं जवळ असलेल्या भिवंडीसारख्या ठिकाणच्या रुग्णालयामध्ये रुग्णवाहिका नसल्याने, रुग्णाचा मृत्यू होत असेल, तर नक्कीच चिंतेची बाब आहे.