ठाणे : डॉक्टरांवरील हल्ल्याचे प्रकार सुरु असतानाच ठाण्यात एक वेगळीच घटना समोर आली आहे. एका मनोरुग्णानेच शेजारच्या रुग्णाच्या छातीवर कैचीनं वार केले आहेत. यात दुसरा पेशंट गंभीर जखमी झाला आहे. तर वाचवण्यास गेलेले दोन वार्डबॉयही जखमी झाले आहेत. किस्मत अली असं या 30 वर्षीय हल्लेखोर रुग्णाचं नाव आहे.


ठाण्यातील खोपटमधील लाईफ लाईन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला आहे. एका मनोरुग्णाने तो दाखल असलेल्या वार्डातील तीन ते चार पेशंटवर कैचीनं वार करत हल्ला केला. यात अबीद मिर्जा बेग हे 30 वर्षीय रुग्ण गंभीररित्या जखमी झाले आहेत. बिल्डिंगचं काम करताना पडल्यामुळे किस्मत अलीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्याच्यावर गेल्या 2-3 दिवसांपासून उपचार सुरु होते.

पोलिसांनी लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये तातडीनं दाखल होत हल्लेखोर रुग्णाला ताब्यात घेतलं आहे. या हल्लेखोर रुग्णाला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.