मुंबई : उद्धव ठाकरे पक्षांतर्गत मोठे बदल करण्याचे संकेत सूत्रांकडून मिळत आहेत. यासाठी शिवसेनेच्या आमदारांशी फोनवर सविस्तर चर्चा करून, उद्धव ठाकरेंनी मंत्र्यांच्या कामगिरीबद्दल आढावा घेतल्याचं समजतं आहे.

आमदारांनी दिलेल्या अहवालाच्या आधारावर उद्धव ठाकरे शिवसेनेच्या मंत्र्यांचे चेहरे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तसंच यासाठी उद्धव ठाकरेंनी शिवसेना आमदारांना कळ सोसण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळं राज्याच्या मंत्रिमंडळात शिवसेनेकडून नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे शिवसेनेचे आमदार सेनेच्या मंत्र्यांच्या कामगिरीवरही कामालीचे नाराज आहेत. काही दिवसांपूर्वी शिवसेना आमदार आणि मंत्र्यांच्या बैठकीत आमदारांनी आपल्याच मंत्र्यांना खडेबोल सुनावले होते. मतदारसंघात फिरताना लोकांनी आमदारांचे कपडे काढण्याचे बाकी राहिले आहे, अशा शब्दात सेनेच्या आमदारांनी मंत्र्यांवर संताप व्यक्त केला होता.

त्यानंतर काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत ग्रामीण भागात नव्याने पक्षबांधणी, केंद्रातली भूमिका, आमदारांच्या मतदारसंघातील कामं आणि पुढच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी याबाबत बैठकीत प्रामुख्याने चर्चा झाली. या बैठकीलाही सेनेचे सर्व मंत्री उपस्थीत होते.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळात फेरबदल झाल्यास ग्रामीण भागातील नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल कि, पुन्हा मातोश्रीशी जवळीक असलेल्यांचीच वर्णी लागेल याची जोरदार चर्चा सध्या सेना आमदारांमध्ये सुरू आहे.

संबंधित बातम्या

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर बैठक, सेनेचे सर्व मंत्री हजर

लोकांनी आमदारांचे कपडे काढायचं बाकी राहिलंय, सेनेचे आमदार मंत्र्यांवर वैतागले !