मुंबई : पासपोर्ट काढण्यासाठी लागणारी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. कालावधी कमी करण्यासाठी एकीकडे ही प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली असतानाच मुंबईत पासपोर्ट मेळाव्याचं आयोजन करण्यात येत आहे.


21 जानेवारी म्हणजे येत्या शनिवारी मुंबईत स्थानिक पासपोर्ट ऑफिसकडून या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. पासपोर्टला वाढती मागणी, आणि पासपोर्ट जारी करताना येणाऱ्या अडचणी दूर करणं हे या मेळाव्याचं उद्दिष्ट आहे.

मुंबईतील सर्व पासपोर्ट सेवा केंद्र (पीएसके)मध्ये हा उपक्रम पार पडेल. पासपोर्टसाठी अपॉइंटमेंट घेण्यात नागरिकांना ज्या अडचणी येतात, त्या दूर करण्यासाठी मेळाव्यात मदत करण्यात येईल. मुंबई, औरंगाबाद, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, दमण, दादरा नगर हवेली आणि सिल्व्हासातील नागरिकांना यात सहभागी होता येईल.

http://www.passportindia.gov.in या लिंकवर जाऊन इच्छुकांना ऑनलाईन नोंदणी करावी लागेल. आवश्यक तितकी फी भरुन अपॉइंटमेंट घेणं जरुरी असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.