मुंबई : तटकरे कुटुंबातील वाद संपला आहे. राजकारणाताील महत्त्वाचे निर्णय मी घेईन, असे घरातील सर्वांनीच मान्य केले आहे, असे सांगत सुनील तटकरे यांनी कौटुंबिक वादावर भाष्य केलं. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे एबीपी माझाच्या 'माझा कट्टा'वर बोलत होते.
म्हणून उमेदवारी यादी जाहीर केली : तटकरे
मुंबई महापालिकेसाठी संजय निरुपम यांनी आघाडी करणार नसल्याचं स्पष्ट केल्यानंतर, राष्ट्रवादीने यादी जाहीर केली. उमेदवारी यादी जाहीर करणं म्हणजे कुरघोडी नव्हे, असं सुनिल तटकरे म्हणाले.
भाजप अनेकांचं स्वागत करण्यास उत्सुक
राष्ट्रवादीला उमेदवारांची कमी नाही. एक एक जागेसाठी 10 ते 12 इच्छुकांची रांग असल्याचंही तटकरे यांनी स्पष्ट केलं. तसंच भाजप सध्या अनेकांचं स्वागत करण्यास उत्सुक आहे. राष्ट्रवादीवर त्यांचं विशेष प्रेम असल्याचा टोला तटकरे यांनी लगावला.
विधानसभेवेळी राष्ट्रवादीने आघाडी तोडली नाही!
राष्ट्रवादीबद्दल नेहमीच संभ्रम निर्माण केला जातो. विधानसभेवेळी राष्ट्रवादीने आघाडी तोडली नाही असं दावा करत, काँग्रेसने आधीच उमेदवार यादी तयार केली होती, त्यामुळे अविश्वासाचं वातावरण झाल्याचं सुनील तटकरे यांनी केला.
नोटाबंदीचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्याला
नोटाबंदीचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्याला बसल्याचं सांगत सहकार क्षेत्रावरील कारवाईबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. सहकारावर सूडबुद्धीने कारवाई करणं गैर असून सहकार क्षेत्राचं योगदान नाकारता येणार नाही, असं तटकरे म्हणाले.
जेलमधील भुजबळांचा फोटो पाहून क्लेष : तटकरे
दरम्यान छगन भुजबळ यांच्याबाबत विचारलं असता सुनील तटकरे म्हणाले की, "जेलमधील भुजबळांचा फोटो पाहून क्लेष झाला, परंतु न्यायालयीन प्रक्रियेमुळे अधिक बोलू इच्छित नाही."