मुंबईत हॉस्पिटलमध्ये फुग्यांचा स्फोट, 4 कर्मचारी जखमी
एबीपी माझा वेब टीम | 18 Jan 2017 10:42 AM (IST)
मुंबई : मुंबईच्या परेलमध्ये फुग्यांचा स्फोट झाल्यानं 4 जण जखमी झाले आहेत. परेलच्या वाडिया रुग्णालयात ही घटना घडली आहे. शुक्रवारी वाडिया हॉस्पिटलच्या सीईओ मिनी बोधनवाला यांचा वाढदिवस होता. हा वाढदिवस साजरा करताना केक कापण्यात आला. मात्र याचदरम्यान शेजारी लावलेला फुग्यांच्या गुच्छामध्ये स्फोट झाला. यात हॉस्पिटलचे 4 कर्मचारी जखमी झाले आहेत. वाढदिवसामुळे लावण्यात आलेल्या फटाक्यांची ठिणगी उडून फुग्यांना लागली आणि स्फोट झाल्याचं बोललं जात आहे. हॉस्पिटल परिसरात ही घटना घडल्यानं हॉस्पिटल प्रशासनानं चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलिसांनीही या घटनेची माहिती न मिळाल्याचं सांगितलं आहे. याप्रकरणी चौकशीनंतर दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे.