मुंबई : मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे आज 15 ऑगस्टपासून लसीचे दोन डोस घेऊन 14 दिवस पूर्ण केलेल्या प्रवाशांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली. मात्र, आज 15 ऑगस्ट आणि रविवार असल्याने स्टेशनवर प्रवाशांची गर्दी दिसून आली नाही. तर सोमवारपासून ही गर्दी वाढण्याची शक्यता आहे, त्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने लोकलच्या फेऱ्यांमध्ये देखील वाढ केली आहे. तसेच 11 ऑगस्टपासून आजपर्यंत एक लाख वीस हजार पेक्षा जास्त नागरिकांनी पास काढल्याची आकडेवारी रेल्वेकडून देण्यात आली आहे.


सर्वसामान्य प्रवाशांना लसीकरण पूर्ण झाले असल्यास लोकलने प्रवासाची जरी मुभा देण्यात आलेली असली, तरी आज रविवार आणि 15 ऑगस्ट एकत्र आल्याने स्थानकांवर आणि लोकांमध्ये गर्दी नव्हती. सोमवारी देखील बँक हॉलिडे असल्याने गर्दी कमी असण्याची शक्यता आहे. मात्र, मंगळवारपासून ही गर्दी वाढू शकते. त्यासाठीच मध्य आणि पश्चिम रेल्वेने लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. सध्या मध्य आणि हार्बर रेल्वेवर लोकलच्या 1612 फेऱ्या धावत आहेत. त्या वाढवून 1686 फेऱ्या दर दिवशी चालवण्यात येणार आहेत. तर पश्चिम रेल्वेवर सध्या धावत असलेल्या 1201 लोकल फेऱ्या वाढवुन 1300 करण्यात आल्या आहेत. या अतिरिक्त लोकल फेऱ्या सोमवारपासून चालवल्या जातील. 


दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यापासून 15 ऑगस्टपर्यंत तब्बल 1 लाख 21 हजार 197 नागरिकांनी रेल्वेचे मासिक पास काढले आहेत. मध्य रेल्वेवर 79 हजार 8 जणांनी तर पश्चिम रेल्वेवर 42189 जणांनी पास काढले आहेत. मध्य रेल्वेच्या डोंबिवली तर पश्चिम रेल्वेच्या बोरीवली स्थानकात पास काढणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. या वाढलेल्या प्रवाशांसाठी रेल्वेने लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे.


आजपासून राज्यात अनेक ठिकाणी निर्बंध शिथिल
आजपासून राज्यात अनेक ठिकाणी निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. खासकरून राज्यभरातील मॉल, शॉपिंग सेंटर मधील दुकानं रात्री दहावाजेपर्यंत उघडे राहतील. मात्र, मॉल, शॉपिंग सेंटरमध्ये येणाऱ्या ग्राहकांना, दुकान मालकांना, या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लसीचे दोन डोस पूर्ण असतील तरच प्रवेश मिळणार आहे. यासोबतच खाजगी कार्यालये, लोकल ट्रेन यासाठीही सूट देण्यात आली आहे.