Mumbai Local Trains: 15 ऑगस्टपासून म्हणजेच आजपासून मुंबईतील लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी पुन्हा सुरू झाल्या आहेत. मात्र, कोरोना प्रतिबंधक लीसचे दोन डोस घेतलेल्यांनाच याचा लाभ घेता येणार आहे. प्रवाशांना लोकल ट्रेनने प्रवासासाठी पास देखील देण्यात आले आहेत. नागरिकांना दोन्ही डोसचे प्रमाणपत्र दाखवल्यावर QR कोड दिला जाईल आणि नंतर पास जारी केला जाईल. मुंबईतील छत्रपती शिवजी महाराज टर्मिनसवर आज लोक प्रवास करताना दिसले.


कोरोना महामारीमुळे लोकल ट्रेन बराच काळ बंद होत्या. यामुळे लोकांना बस किंवा खाजगी वाहनांच्या मदतीने प्रवास करावा लागत होता. अखेर 15 ऑगस्टपासून सर्वसामान्यांना लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आज छत्रपती शिवजी महाराज टर्मिनसवर नागरिकांची गर्दी पहायला मिळाली. प्रवाशांकडे लसीकरण पास आहे की नाही याची तपासणी टीसीद्वारे केली जात आहे.


एबीपी न्यूजने मध्य रेल्वेच्या सीपीआरओ शिवाजी सुतार यांना विचारले असता लोकल ट्रेन सुरू झाल्यापासून मध्य रेल्वेने 4 दिवसात सुमारे 79 हजार लोकांना पास दिले असल्याचे सांगितले. हे पास तपासण्यासाठी टीसी देखील उपस्थित राहतील. पासशिवाय प्रवासी आढळल्यास त्यांच्यावर 500 रुपये दंड आकारला जाईल. आज रविवार आणि स्वातंत्र्य दिन असल्याने आज प्रवासी कमी दिसत आहेत.


लोकल ट्रेन सुरु झाल्याने मुंबईकर खुश
लोकल ट्रेन सुरु झाल्याने प्रवासी आनंद व्यक्त करत आहेत. प्रवाशांना विचारले असता त्यांनी सांगितले की लोकल सुरु झाल्याने आता वेळ आणि पैसा दोन्हींची बचत होणार आहे. लोकल बंद असल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते.


15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने लोकल ट्रेन पुन्हा सुरू झाल्या असून लोकांमध्ये उत्साह आहे. त्याचबरोबर ते या निर्णयाचे स्वागतही करत आहेत. पण कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती आहे. त्यामुळे लोक कोरोना टाळण्यासाठी सर्व नियमांचे पालन करतील, अशी आशा प्रशासनाला आहे.