मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे. भाजपला सत्तेतून घालवू आणि नंतर देशाचा पंतप्रधान कोण होणार हे ठरवू, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.
यशवंतराव चव्हाण सभागृहात आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना मार्गदर्शन करत भाजपावर जोरदार टीका केली. भाजपाला सत्तेपासून दूर केलं पाहिजे, त्यानंतर देशाचा पंतप्रधान कोण हे बसून ठरवू, असं शरद पवार यांनी सांगितले.
आगामी निवडणुकीत भाजपसोबत न जाणाऱ्या पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही, पवारांनी यावेळी सांगितले.
"देशभरात भाजपाविरोधात वातावरण तयार झाले असून, आता सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. विरोधी पक्षाचा आगामी निवडणुकीत पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण? असे विचारले जात आहे. मात्र काँग्रेसनेही स्पष्ट केले आहे की, आमचा पंतप्रधान पदाचा दावा नाही. त्यामुळे ज्या पक्षाचे खासदार जास्त त्या पक्षाचा पंतप्रधान असेल", असं आधीच ठरलं असल्याचं पवारांनी यावेळी सांगितले.
"जे बदल घडवून आणण्यासाठी तयार आहेत, त्यांना मी सहकार्य करणार असून इतरांनीही हा समजूतदारपणा दाखवावा. विविध राज्यातील मोठ्या पक्षांनी इतरांना सहकार्य करायला हवं ", असे देखील पवार म्हणाले.
