मुंबई : राष्ट्रवादीने येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत 50-50 टक्के जागांचा प्रस्ताव काँग्रेसला दिला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात झालेल्या बैठकीत आगामी निवडणुकांच्या जागा वाटपावर चर्चा झाल्याचं समोर आलं आहे.

2014 लोकसभा निवडणुकीत  महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे चार खासदार तर काँग्रेसचे दोन खासदार निवडून आले. विधानसभेत काँग्रेसचे 42 आमदार तर राष्ट्रवादी 41 आमदार आहेत. त्यामुळे राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद समान ताकद आहे, असं सांगत जागा वाटप समान म्हणजे 50-50 टक्के व्हावं असा प्रस्ताव शरद पवार यांनी राहुल गांधींना दिल्याचं समजत आहे.

शरद पवार यांच्या प्रस्तावावर राहुल गांधी यांनी अजूनही निर्णय दिला नसल्याची माहितीही मिळत आहे. त्यामुळे राहुल गांधी शरद पवारांचा प्रस्ताव स्वीकारणार की नाही हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

राष्ट्रवादी काँग्रेसची दोन दिवसाची राष्ट्रीय कार्य़कारिणी बैठक 28-29 ऑगस्ट रोजी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी-शरद पवार यांच्या भेटील विशेष महत्त्व आहे.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली असून, आज यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली.