Mumbai Vidyavihar Building Collapsed : मुंबईतील घाटकोपर येथील दुमजली इमारतीचा भाग कोसळून दुर्घटना घडली आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दोन जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. विद्याविहारमधील राजावाडी कॉलनी येथील इमारतीचा भाग कोसळला. दुर्घटनास्थळी अग्निशमन दल आणि एनडीआरएफ दाखल झाले आहेत. युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. ढिगाऱ्याखाली दोन जण अडकल्याची भीती असून त्यांचा शोध सुरु आहे.


विद्याविहार येथील दुमजली इमारतीचा भाग कोसळला


मुंबईच्या विद्याविहार येथील जुन्या दुमजली इमारतीचा काही भाग कोसळल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी सकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. ही इमारत 40 वर्ष जुनी असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, मुंबईमध्ये शनिवारपासून ठिकठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. अनेक भागात पावसामुळे पाणी साचले आहे. पावसामुळे इमारतीचा भाग खचल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मुंबईतील पहिल्याच पावसात या दुर्घटनेमुळो धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


पाहा व्हिडीओ : विद्याविहार येथील 40 वर्ष जुन्या इमारतीचा भाग कोसळला



माजी शिक्षण मंत्री आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी दुर्घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, 'विद्याविहारमध्ये इमारत कोसळली असून त्यात दोन जण अडकले आहेत. याची चौकशी झाली पाहिजे. मुंबईमध्ये शनिवारी झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी भरलं आहे. मुख्यमंत्री स्वतः नाल्यात उतरले, नालेसफाई झालेली नाही. मुंबईत जागोजागी पाणी तुंबलं आहे. मुंबईकरांच्या प्रश्नाबाबत मुंबई महानगरपालिकेने काळजी घ्यायला हवी. पहिल्या पावसातच हे चित्र आहे. पावसाच्या आधीच मुंबई मनपाची तयारी व्हायला हवी होती. लोकांच्या जीवाशी खेळ व्हायला नको.'


वर्षा गायकवाड यांची दुर्घटनास्थळी पाहणी


वर्षा गायकवाड यांनी पुढे त्यांनी सांगितलं की, 'गोवंडीत दोन नालेसफाई करणाऱ्या कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. या कामासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करायला पाहिजे. मिलन सबवे पहिलं पण अंधेरी सब वे आणि इतर ठिकाणी परिस्थिती वेगळी आहे. अशा दुर्घटना होऊ नये म्हणून काम करायला पाहिजे. अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. नगरसेवक नाहीत म्हणून मॉनिटरिंग करण्यास कोणी नाही. पण प्रशासक आहेत, कारवाई झाली पाहिजे.'


वसईमध्ये इमारतीचा सज्जा कोसळला


वसईमध्येही इमारतीचा काही भाग कोसळला आहे. वसईमधील एका जुन्या इमारतीचा सज्जा कोसळला आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. शनिवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून वसईमध्ये दमदार पावसाने हजेरी लावली आहे. अचानक सुरू झालेल्या पावसाने वसईच्या हत्तीमोहला परिसरातील एका जर्जर इमारतीचा सज्जा कोसळला आहे. शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. अद्याप पावसाळा म्हणावा तसा सुरू ही झाला नाही तरी जून महिन्यातील पहिल्याच जोरदार पावसात एका इमारतीचा सज्जा कोसळल्याने जुन्या इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.