मुंबई :  अंधेरीतील कोसळलेल्या गोखले पुलाचा भाग  कोसळल्यानंतर आता या दुर्घटनेवरुन राजकारण होताना दिसून येत आहे. अवघ्या काही तासातच दुर्घटनेवरुन शिवसेना आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगला आहे.

मुंबई महापालिका असो वा राज्य सरकार प्रत्येक जण आपली पोळी भाजताना दिसत आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये या दुर्घटनेवरुन आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु झालं आहे.

गोखले पूल 60 वर्षे जुना आहे. या पुलाच्या देखभालीची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची आहे. असा दावा मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला आहे. अंधेरीतील कोसळलेल्या गोखले पुलाचा भाग किंवा हा पूल रेल्वेचा आहे. त्याची देखभाल करण्याची जबाबदारी ही रेल्वेची आहे, अशी प्रतिक्रिया महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली. ते एबीपी माझाशी बोलत होते. "देखभालीसाठी बीएमसी रेल्वेला मागणीनुसार पैसेही देते. रेल्वेने जबाबदारी टाळू नये. आम्ही जबाबदारी कधीच झटकत नाही. पूलाची जबाबदारी बीएमसीची आहे हे सांगत रेल्वे प्रशासन दिशाभूल करतेय", असा आरोप महापौरांनी केला.

महापौरांच्या या आरोपांना उत्तर देताना भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी “मुंबई महापालिकेचे महापौर काय बोलेल यात मला जायचे नाही, मला समस्यांचे निराकारण करण्यात जास्त रस असल्याचे त्यांनी म्हटले”.

खरं तर रेल्वे मंत्रालय भाजपकडे आहे. मुंबईतील एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी फूट ओव्हर ब्रीज, जिने आणि इतर सुविधा अद्ययावत करण्यावर भर देऊ असं आश्वासन दिलं होतं. मात्र बोलबच्चनगिरीशिवाय मुंबईकरांच्या हाताला काहीही लागलेलं नाही हे दिसून येते. त्यामुळे यावरुन आता शिवसेना आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगणार हे नक्की.