मुंबई : संततधार पावसाचा मुंबईतील लोकल रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. अंधेरी स्टेशनवर विलेपार्ले एंडच्या बाजूने प्लॅटफॉर्म क्र. 8 आणि 9 च्या दरम्यान पुलाचा फुटपाथ कोसळल्यामुळे रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. यावेळी बोरिवलीवरुन  चर्चगेटला जाणाऱ्या रेल्वेचा अपघात होता होता वाचला. मोटरमनने प्रसंगावधान दाखवत इमर्जन्सी ब्रेक मारल्याने मोठा अनर्थ टळला.


मंगळवारी सकाळी साडे सातच्या सुमारास पुलाचा फुटपाथ रेल्वे रुळांवर कोसळला. अंधेरी पूर्व आणि पश्चिमला जोडणारा हा गोखले ब्रिज आहे. या घटनेत पाच जण जखमी झाल्याची माहिती आहे. हा पूल पडला तेथून काही अंतरावरच एक लोकल ट्रेन होती. ही लोकल बोरिवलीवरुन चर्चगेटच्या दिशेने जात असताना पुलाचा काही भाग कोसळत असल्याचे मोटरमन चंद्रशेखर सावंत यांच्या लक्षात आले. यावेळी मोटरमनने प्रसंगावधान दाखवत काही अंतरावर इमर्जन्सी ब्रेक दाबत लोकल थांबवली. मोटरमनच्या या प्रसंगावधानने अनेकांचे प्राण वाचले.

पश्चिम रेल्वे ठप्प असताना मध्य रेल्वेच्या सायन स्टेशनजवळ ट्रॅकवर पाणी साचलं आहे. यामुळे मध्य रेल्वे वाहतुकीचाही खोळंबा झाला आहे. तर पहाटेपासून मुंबईत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. शहर आणि उपनगरात जोरदार पाऊस पडतो आहे. अंधेरी, गोरेगाव, बोरिवली , घाटकोपर, भांडुप मुलुंड, चेंबूर कुर्ला, सायन, दादर सह अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.