मुंबई : पावसामुळे मुंबईचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अंधेरीतील पुलाचा पादचारी भाग कोसळल्यामुळे पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे सर्व भार आता रस्ते वाहतुकीवर आहे. मात्र या संधीचा फायदा घेत टॅक्सीचालक प्रवाशांची लूट करत आहेत.


प्रवाशांची लूट करत असणाऱ्या अशाच काही टॅक्सी चालकांशी एबीपी माझाने बातचीत केली. दादर टीटी परिसरात एबीपी माझाच्या प्रतिनिधीने टॅक्सीचालकाला अंधेरीला जाण्यासाठी विचारणा केली. मात्र काहींनी येण्यास नकार दिला, तर काहींनी जास्त पैशांची मागणी केली.



दादरहून अंधेरी पूर्वला येण्याचे दोनशे ते अडीचशे रुपये होतात. मात्र एका टॅक्सीवाल्याने आमच्याकडे पाचशे रुपये मागितले, तर दुसऱ्याने सहाशे रुपये. शिवाय एकाने मीटरच्या अतिरिक्त दीडशे रुपयांची मागणी केली. अनेक जण वेगवेगळी कारणं सांगून येण्यास नकार देत आहेत. टॅक्सीवाल्यांचा हा मनमानी कारभार एबीपी माझाच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या पावसातही हीच परिस्थिती होती. तेव्हाही एबीपी माझाने ही बातमी दिली होती. मात्र मनमानी करणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांना चाप लावण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

अंधेरीत पुलाचा पादचारी भाग कोसळला

मुंबईत कालपासून सुरु झालेल्या जोरदार पावसामुळे अंधेरीतील गोखले ब्रिजच्या फुटपाथचा काही भाग कोसळला. आज सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. फुटपाथचा भाग थेट ओव्हरहेड वायरवर कोसळल्यामुळे  पश्चिम रेल्वेवरील अंधेरीपासूनची दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली.

फलाट क्रमांक 8 आणि 9 यांच्यामधील हा ब्रिज होता. त्या ब्रिजवरील फुटपाथचा काही भाग कोसळला. हा पूल 1960-70 चा असल्याने खूपच जीर्ण झाला होता, त्याला लोखंडाचा सपोर्ट दिला होता. मात्र आज सकाळी साडेसातच्या सुमारास तोही कोसळला. ब्रिज आणि लोखंडाचा सपोर्ट ओव्हरहेड वायरवर कोसळल्यामुळे ओव्हरहेड वायर तुटल्या.

ब्रिज कोसळल्याने मोठ्या प्रमाणात ढिगारा साचला आहे. पावसामुळे हा ढिगारा काढणं मोठं जिकीरीचं काम आहे.