मुंबई : विद्यमान मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्या निवृत्तीनंतर रिक्त झालेल्या जागेवर परमबीर सिंह यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. परमबीर सिंह 1988 च्या आयपीएस बॅचचे आधिकारी आहेत. याआधी परमबीर सिंह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदाची जबाबदारी सांभाळत होते. महाराष्ट्रातील 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळाप्रकरणातील मुख्य आरोपी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पहिली क्लीन चिट देणारे परमबीर सिंहच होते. परमबीर सिंह यांच्या नियुक्तीमुळे रिक्त झालेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी बिपीन के सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


पमबीर सिंह यांच्यासह सदानंद दाते, रश्मी शुक्ला, हेमंत नगराळे, के. व्यंकटेशम यांची नावं मुंबई पोलीस आयुक्तपदाच्या शर्यतीत आघाडीवर होती. संजय बर्वे 31 ऑगस्ट रोजी निवृत्त होणार होते. मात्र त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात होती, ही मुदतवाढ 30 नोव्हेंबर रोजी संपल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा तीन महिने मुदत वाढवून देण्यात आली. ही मुदतवाढ 29 फेब्रुवारी रोजी संपत असल्याने रिक्त झालेल्या आयुक्तपदी परमबीर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.





परमबीर सिंह यांनी मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे. परमबीर सिंह यांनी चंद्रपूर, भंडारा जिल्ह्याचं पोलीस अधीक्षकपद सांभाळलं आहे. याशिवाय एटीएसचे डेप्युटी आयजीही होते. परमबीर सिंह यांनी यापूर्वी ठाण्याचे पोलीस आयुक्तपद सांभाळलं होतं. त्यांच्या कारकिर्दीत कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला खंडणीच्या गुन्ह्यात मुंबईतून अटक करण्यात आली होती. त्याच्यावर मोक्कान्वये कारवाई करण्यात आली होती, तो अद्यापही कारागृहात आहे. याशिवाय त्यांनी अंमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश केला होता. त्यामध्ये सध्या परदेशात स्थायिक असलेली बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीचाही समावेश असल्याचे त्यांनी उघड केलं होतं. त्यानंतर बॉलिवडूमध्ये खळबळ उडाली होती. सदर प्रकरणी तिच्या पतीवरही गुन्हे दाखल करण्यात आले होते.