Panvel ITI and B.Ed. Collage: मुंबईपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या पनवेलमधील सरकारी शिक्षण संस्थांच्या दुरावस्थेचं भीषण चित्र (Panvel News update) एबीपी माझानं (ABP Majha Exclusive) समोर आणलं होतं. आता पनवेल आयटीआय आणि सरकारी डीएड कॉलेजची ही स्थिती पाहिल्यानंतर सामान्य लोकांसह राजकीय पक्षांकडून संताप व्यक्त केला जात आहे. ही विदारक अवस्था दाखवल्यानंतर युवासेना आणि मनसे देखील आक्रमक झाली आहे. या सर्व प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी युवासेनेनं केली आहे तर तात्काळ हे चित्र बदला अन्यथा मनसे आपल्या पद्धतीने हा प्रश्न सोडवेल, असा इशारा मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी दिला आहे. दूरावस्थेत असलेल्या धोकादायक पनवेल आयटीआय कॉलेजचा महिन्यात चेहरामोहरा बदलणार असल्याचं कालच मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितलं आहे.
पनवेलमधील ITI आणि बीएड महाविद्यालयाच्या धोकादायक इमारतीत जीव मुठीत घेऊन हजारपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ना हॉस्टेलची योग्य सोय, ना व्यवस्थित वर्गखोल्या, ना खानावळ, ना कँटीन अशाच परिस्थिती इथे शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे वास्तव एबीपी माझाने काल समोर आणले होते. पनवेलमधील आयटीआय कॉलेजची अवस्था एखाद्या भूत बंगल्यासारखी झाली असल्याचं भीषण चित्र आहे. विशेष म्हणजे 2014 साली ही इमारत धोकादायक ठरवूनही त्याच ठिकाणी वर्ग भरवले जातात. म्हणजेच जवळपास आठ वर्ष हजारो विद्यार्थ्यांनी जीवमुठीत घेऊन शिक्षण घेतलं. यासंदर्भात एबीपी माझानं वास्तव समोर आणल्यानंतर आता राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत.
एक धोरण ठरवून यावर तातडीने काम करण्याची गरज - वरुण सरदेसाई
युवासेनेचे वरुण सरदेसाई यांनी म्हटलं आहे की, या वसतीगृहाच्या प्रश्नासंदर्भात युवासेना शिष्टमंडळ उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेणार आहे. विद्यार्थी कशाप्रकारे राहताहेत कशाप्रकारे शिक्षण घेतात याचं वास्तव महाराष्ट्रासमोर एबीपी माझाने दाखवलं. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात तुम्ही कुठेही गेलात शासकीय वस्तीगृह दयनीय अवस्थेत आहे. विद्यार्थी संघटनेने आंदोलन करायची आणि सरकारने आश्वासन द्यायची मात्र काहीच होत नाही. याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, असं सरदेसाई यांनी म्हटलं आहे. राजकारण सुरूच राहील मात्र विद्यार्थ्यांच्या भवितव्याकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे. सरकारने स्वतः ऑडिट करून एक धोरण ठरवून यावर तातडीने काम करण्याची गरज आहे, कोरडी आश्वासन देऊ नयेत, असं देखील ते म्हणाले.
साध्या सोयीसुविधा विद्यार्थ्यांना देऊ शकत नाही हे दुर्दैव- मनसे
मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी म्हटलं आहे की, राज्यातील सर्व आयटीआयची पाहणी करून समिती नेमून गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना सोयीसुविधा द्याव्यात. एकीकडे अमृत महोत्सव आपण साजरा करतोय तर दुसरीकडे अशाप्रकारे आपल्या राज्यात वसतीगृहांची दुर्दशा झाली आहे. साध्या सोयीसुविधा विद्यार्थ्यांना या ठिकाणी देऊ शकत नाही हे दुर्दैव आहे. मी मुख्यमंत्री आणि त्यासोबतच कौशल्य विकास मंत्री यांना विनंती करतो की फक्त पनवेलचं हे आयटीआय कॉलेज, हॉस्टेल नाही तर महाराष्ट्रातील इतर आयटीआय कॉलेजमध्ये सुद्धा ही स्थिती आहे. त्यामुळे या संदर्भात समिती नेमून या गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात ही मागणी करतो. आपण लक्ष घालून तात्काळ हे चित्र बदला. अन्यथा मनसे आपल्या पद्धतीने हा प्रश्न सोडवेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
इतर महत्वाचा बातम्या
Panvel ITI Hostel : फुटलेल्या खिडक्या, तुटलेले बाकडे...वसतिगृहाची अवस्था भूतबंगल्यासारखी