Maharashtra Politics Shivsena : बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज (Mahant Sunil Maharaj) यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. महंत सुनील महाराज यांच्या शिवसेना प्रवेशामुळे मंत्री संजय राठोड (Minister Sanjay Rathod) यांच्या अडचणीत वाढ झाली असल्याचे म्हटले जात आहे. महंत सुनील महाराज यांच्यासह बंजारा समाजाच्या अनेक कार्यकर्त्यांनी 'मातोश्री'वर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.


बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असणाऱ्या पोहरादेवीचे सुनील महाराज महंत आहेत. मंत्री संजय राठोड यांना पुन्हा मंत्रीपद मिळावे यासाठी महंत सुनील महाराज यांनी प्रयत्न केले होते. संजय राठोड यांना एका युवतीच्या आत्महत्येप्रकरणात मंत्रिपद सोडावे लागले होते. राठोड यांच्या पाठिशी बंजारा समाजाला उभे करण्यासाठी सुनील महाराज यांनी पुढाकार घेतला होता. 


शिवसेनेत फूट पडल्यानंतर सुनील राठोड यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळाले. मंत्रिपद मिळाल्यानंतर संजय राठोड यांनी महंतांना भेट नाकारली होती. त्यानंतर सुनील महाराज आणि संजय राठोड यांच्या वितुष्ट निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली होती. 


यावेळी बोलताना महंत सुनील महाराज यांनी म्हटले की, नवरात्रोत्सवात मोठा निर्णय घेणार असल्याचे याआधीच जाहीर केले होते. त्यानंतर आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. पोहरादेवी येथे येण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आमंत्रण देण्यात आले आहे. निवडणूक लढवण्याबाबत उद्धव ठाकरे आणि बंजारा समाज निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. 


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, 'साधू संत येती घरा, तोचि  दिवाळी दसरा' असे म्हटले जाते. दसराजवळ आला असताना महंत शिवसेनेत आले आहेत. ज्यांना आम्ही न्याय दिला. त्यांनी पाठित खंजीर खुपसला असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. दसऱ्यानंतर मी महाराष्ट्र दौरा करणार आहे. त्यादरम्यान पोहरादेवीलादेखील जाणार असल्याचे उद्धव ठाकरे सांगितले. लढताना जे सोबत येतात त्यांचे जास्त महत्व असते, असेही त्यांनी सांगितले. 


शिवसेनेचा एकच दसरा मेळावा


उद्धव ठाकरे यांनी यावेळी दसरा मेळाव्याबाबत भाष्य केले. इतरांचेही दसरा मेळावे होतात. पंकजा मुंडे यांचाही दसरा मेळावा होत असतो, असेही त्यांनी सांगितले. शिवसेनेचा फक्त एकच दसरा मेळावा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


इतर महत्त्वाच्या बातम्या: